सुरेश कमळेंना अखेर हाकलले
By admin | Published: June 23, 2015 12:35 AM2015-06-23T00:35:35+5:302015-06-23T00:35:35+5:30
जिल्हा परिषदेचा निर्णय : पाणी योजनातील गैरकारभार नडला; जीवन प्राधिकरणाकडे रवानगी
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश भीमराव कमळे यांना अखेर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सेवेतून हाकलले. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी, तेरवाड, चिपरी या पाणीपुरवठा योजनांमधील गैरकारभार कमळे यांना नडला असून, त्यांची रवानगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.
गणेशवाडी येथील नळपाणी पुरवठा योजनेचे ७० टक्के काम पूर्ण होऊनही संबंधितांना पहिल्या हप्त्याची रक्कम न दिल्याने ग्रामस्थ व जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रार केली होती. त्याचबरोबर तेरवाड व कवठेसार येथील नळपाणी योजनेच्या मोजमाप नोंदवहीमध्ये तफावत आढळली होती. याबाबत त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून खातेनिहाय चौकशी सुरू आहे. चिपरी येथील नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत बसविण्यात आलेल्या वॉटर मीटर कामांचे मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने केल्याने शासनाचे आर्थिक नुकसान झाले होते. या सर्व प्रकरणांबाबत कमळे यांच्याकडे खुलासा मागितला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष व काही सदस्यांनी उपविभाग शिरोळ येथे भेट दिली असता ते मुख्यालयी हजर नव्हते. याबाबतही त्यांच्याकडे खुलासा मागितला होता; पण ते याबाबत काहीच खुलासा करू शकले नाहीत. यावरून त्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाल्याने सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी त्यांना कार्यमुक्त केले.
सुरेश कमळे हे प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत उपअभियंता
पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करता येत नसल्याने त्यांना कार्यमुक्त केले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागात तर ‘आता कोणाचा क्रमांक’, अशी दबक्या आवाजात चर्चा होती. जिल्हा परिषदेच्या सभेतही त्यांच्या
कारभारवर जोरदार टीका झाली होती. (प्रतिनिधी)