“ऑलिम्पिकपटू स्वप्निल कुसाळेला पाच कोटी द्या; बालेवाडीत फ्लॅटची सुविधा उपलब्ध करा”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 09:50 AM2024-10-08T09:50:20+5:302024-10-08T09:51:58+5:30
हरयाणा सरकारने खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपये जाहीर केले. मात्र महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. सरकारला विधानभवनात बोलावून स्वप्निलचा सत्कार करण्यासही वेळ मिळत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्निल कुसाळे याने दमदार कामगिरी करून कांस्यपदक पटकावून देशाचे नाव उंचावले. मात्र, राज्य सरकारकडून त्याच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे. स्वप्निलला राज्य सरकारने किमान पाच कोटी रुपये जाहीर करावे. त्याला बालेवाडीत फ्लॅटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आई अनिता कुसाळे उपस्थित होत्या.
सुवर्णपदक जिंकायचे आहे
सुरेश कुसाळे म्हणाले, स्वप्निलचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जमीन, दागिने विकले. आता त्याचे पुढील ध्येय २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धेचे असून, त्याला सुवर्णपदक जिंकायचे आहे.
सध्या सरकारने कांस्यपदक विजेत्यांसाठी १ कोटी रुपये जाहीर केले आहेत. मात्र, खेळाचा खर्च पाहता ही रक्कम तोकडी आहे. भविष्यातील करिअरसाठी सरकारने स्वप्निलला मोठे आर्थिक पाठबळ द्यावे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांत कोल्हापूर दौऱ्यावर असल्याचे समजते. याप्रकरणी त्यांची भेट घेऊन ही मागणी मांडली जाणार आहे.
हरयाणा सरकारने खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपये जाहीर केले. मात्र महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे.
स्वप्निलच्या सत्काराला वेळ नाही
सरकारला विधानभवनात बोलावून स्वप्निलचा सत्कार करण्यासही वेळ मिळत नाही. ऑलिम्पिक सामने सुरू होण्यापूर्वी बक्षिसांची रक्कम जाहीर करण्याची गरज होती. पदक जिंकल्यानंतर सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांसाठी बक्षीस जाहीर करण्यात आले, असे कुसाळे म्हणाले.