सर्फनाला प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे आदेश काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:30 AM2021-09-04T04:30:31+5:302021-09-04T04:30:31+5:30
कोल्हापूर : सर्फनालाच्या ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनीचे पसंती अर्ज दिले आहेत, त्यांना तातडीने जमीन वाटपाचे आदेश काढा, अशी सूचना आमदार ...
कोल्हापूर : सर्फनालाच्या ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनीचे पसंती अर्ज दिले आहेत, त्यांना तातडीने जमीन वाटपाचे आदेश काढा, अशी सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत दर बुधवारी बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
बैठकीला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, आजऱ्याचे तहसीलदार विकास आहीर, सर्फनाला प्रकल्पग्रस्त संघटनेचे सुरेश मिटके, संतोष पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. या वेळी आमदार आबिटकर यांनी पात्र जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करा. ज्या खातेदारांची ६५ टक्के रक्कम कपात केली आहे; पण बुडीत क्षेत्राच्या वरील बाजूस शिल्लक जमीन असल्याने त्याला जमीन नाकारली गेली आहे. पण या जमिनी कसण्यायोग्य नाहीत, तसेच पाणी साठल्यानंतर त्या कसता येणार नाहीत, अशा खातेदारांनाही जमीन द्या. गावठाणातील संपादन घरांच्या मोजणीचे काम पूर्ण करा. या घरांच्या किमती चालू बाजारभावाने व सानुग्रह अनुदानासह भूसंपादन कायद्यान्वये करा. कलम २८ खाली दावे दाखल केलेल्या प्रकल्पग्रस्तांना रक्कम द्या. वाटप केलेल्या, पण कसण्यास योग्य नसलेल्या जमिनी बदलून द्या, अशा सूचना केल्या.
----