बसर्गे गायरान, बंधाऱ्याचे पुण्याच्या पथकाकडून सर्वेक्षण
By admin | Published: June 12, 2017 01:04 PM2017-06-12T13:04:21+5:302017-06-12T13:08:32+5:30
उन्नत भारत अभियान : धनगरवाड्याला दिली भेट
आॅनलाईन लोकमत
गडहिंग्लज, दि. १२ : उन्नत भारत अभियानांतर्गत पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सी.ओ.ई.पी.) पथकाने गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथील गायरानाचे तसेच मुख्य बंधाऱ्याच्या जागेचे सर्वेक्षण केले. हे गाव शिवाजी विद्यापीठाने दत्तक घेतले आहे.
सी.ओ.ई.पी. चे तज्ञ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ यांच्या प्रयत्नांमुळे उन्नत भारत अभियानांतर्गत प्रा. डॉ. नितीन मोहिते व प्रा. नवगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस विद्यार्थ्यांच्या या पथकाने बसर्गे बुद्रुक गावाच्या धनगरवाड्याजवळच्या गायरान जमिनीचे तसेच मुख्य बंधाऱ्याच्या जागेचे सर्वेक्षण पूर्ण केले.
या सर्वेक्षणानंतर गायरानामध्ये करण्याच्या जलसंधारणाच्या उपयायोजनांचा तसेच बंधाऱ्याच्या सुशोभीकरण, स्वच्छता तसेच पुनरुज्जीवनसाठीचा आराखडा तयार करून बसर्गे ग्रामपंचायतीला सादर करण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. नितीन मोहिते यांनी सांगितले.
याप्रसंगी गडहिंग्लजचे तहसिलदार राजेश चव्हाण यांनी सी.ओ.ई.पी.च्या पथकाची भेट घेऊन विकास आराखड्याविषयी चर्चा केली. यावेळी शिवाजी विद्यापीठामार्फत राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून केलेल्या गाळमुक्त बंधाऱ्याच्या कामाची आणि सेवावर्धिनी या संस्थेने जलदूत या प्रकल्पांतर्गत बसर्गे गायरानामध्ये केलेल्या सलग समतल चर (सी.सी.टी.) कामाचीही या पथकाने पाहणी केली.
या सर्वेक्षणासाठी बसर्गेचे उपसरपंच सुरेश मणिकेरी, ग्रामपंचायत सदस्य काशाप्पा जोडगुद्री, माजी सरपंच श्रीपतराव चौगुले, विजय हिरेमठ, उत्तम भुइम्बर यांचे सहकार्य लाभले.