महापौरांचे वर्कशॉपमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’, अचानक दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:52 PM2020-02-21T13:52:01+5:302020-02-21T13:55:25+5:30
कोल्हापूर : उमा टॉकीज येथील महापालिकेच्या वर्कशॉपमध्ये महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, परिवहन ...
कोल्हापूर : उमा टॉकीज येथील महापालिकेच्या वर्कशॉपमध्ये महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी गुरुवारी सकाळी ९.४५ वा. अचानक भेट दिली. यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
कामाच्या वेळेत चहा पिण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. कालबाह्य वाहने स्क्रॅप करणे, बंद असणारे रोलर तातडीने दुरुस्त करणे, यांसह रिक्त पदे, वाहनांचे नियोजन कसे करणार, याबाबत चार दिवसांत अहवाल देण्याचे आदेश महापौर आजरेकर यांनी दिले.
महापौर आजरेकर म्हणाल्या, नवीन घेण्यात आलेले छोटे औषध फवारणीचे ट्रॅक्टर पासिंग करण्यात यावेत. कालबाह्य वाहने तत्काळ स्क्रॅप करा. नवीन वाहने किती लागणार आहेत, याचा प्रस्ताव सादर करा. ७ पैकी ४ आर. सी. गाड्या कायम बंद असतात. त्या तत्काळ दुरुस्त करा. वर्कशॉप विभागाची जबाबदारी असणाºया उपआयुक्तांनी महिन्यातून दोन वेळा भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घ्यावा, असे आदेश दिले.
उपमहापौर मोहिते म्हणाले, नवीन घेण्यात आलेले टँकर अद्याप रस्तावर आलेले नाहीत. त्यामध्ये काही त्रुटी आहेत. मोटार कमी क्षमतेची बसविली आहे. नवीन टँकर खरेदी करतानाच तांत्रिक माहिती असणाऱ्यांच्या लक्षात ही बाब यायला पाहिजे होती. त्यामुळे संबंधिताकडून ही रक्कम वसूल करावी.
१0 पैकी ६ रोलर बंद आहेत. या रोलरांना स्पेअरपार्ट दिले जात नाहीत. नवीन रोलर खरेदी न करता त्या रकमेमध्ये बंद असलेले ६ रोलर दुरुस्त होऊ शकतात. स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांनी स्टोअर विभागाकडून किती कंटेनर दुरुस्त करून दिले जातात.
हे कंटेनर खासगी एजन्सीमार्फत लेबर चार्जेसवर वकॅशापमध्येच दुरुस्त करून घ्या, अशी सूचना केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, वकॅशॉप विभागप्रमुख चेतन शिंदे, आशपाक आजरेकर उपस्थित होते.
रुग्णवाहिका, शववाहिकेसाठी दानशूर व्यक्तींचे सहकार्य घ्या
रुग्णवाहिका, शववाहिका कालबाह्य झाल्या आहेत. ही वाहने सी.एस.आर.फंडाद्वारे किंवा दानशूर व्यक्ती देण्यास इच्छुक असल्यास त्यांच्याकडून घ्याव्यात, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी केले.
स्क्रॅपच्या टायरींवरून उपमहापौर भडकले
वकॅशॉपमध्ये पाहणी करताना स्क्रॅप झालेल्या शेकडो टायरी परिसरात टाकल्याच्या आढळून आल्या. यावर उपमहापौर संजय मोहिते कर्मचाऱ्यावर भडकले. ते म्हणाले, डेंग्यूमुळे टायर असणारे नागरिक, विके्रत्ये यांच्यावर महापालिका दंडात्मक कारवाई करते. तुम्हीच वर्कशॉपमध्ये टायरी ठेवल्या आहेत. आता संबंधित अधिकाऱ्यांनाच दंड लावा.
मग जीपीएस सिस्टीम कशाला बसविली?
सर्व वाहनांचे योग्य नियोजन होत नाही. प्रभागात आवश्यक असणारी वाहने वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी आहेत. वर्कशॉपमध्ये सकाळी लवकर बाहेर पडतात. मात्र, प्रभागात नसतात. तसेच दुपारी कामाची वेळ संपण्यापूर्वीच वाहने लावून जातात. मग, जीपीएस सिस्टीम कशाला बसविली आहे? असा सवाल महापौर आजरेकर, स्थायी समिती सभापती कवाळे यांनी केला. जी.पी.एस. सिस्टीमच्या मदतीने तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले.