पर्यायी शिवाजी पुलाची ‘पुरातत्त्व’कडून पाहणी
By admin | Published: October 3, 2016 12:41 AM2016-10-03T00:41:08+5:302016-10-03T00:41:08+5:30
कामाला गती मिळणार : महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागही अनभिज्ञ
तानाजी पोवार ल्ल कोल्हापूर
‘हेरिटेज’च्या गोंडस नावाखाली व पर्यावरणवाद्यांच्या हटवादी भूमिकेमुळे गेले दहा महिने रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाच्या उर्वरित कामाला हिरवा कंदील मिळाला आहे; पण आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी गुपचूप कोल्हापुरात येऊन शिवाजी पुलानजीकच्या पुरातन ब्रह्मपुरी टेकडीची आणि परिसराची पाहणी करून
निघून गेले. विशेष म्हणजे, हे अधिकारी येऊन गेल्यानंतर त्याची माहिती महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानांवर गेली!
कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील शहरातील ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे आयुर्र्मान संपल्याने त्याला पर्यायी पूल उभारण्याचे काम सुरू होते. हे काम ७० टक्के पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये काही पर्यावरणवाद्यांच्या हटवादी भूमिकेमुळे ऐतिहासिक ब्रह्मपुरी टेकडीचा आधार घेत ‘हेरिटेज’ या गोंडस नावाखाली या पुलाचे बांधकाम बंद पडले. पर्यायी पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे यासाठी कोल्हापुरात जनआंदोलन उभारले, मोर्चा काढला, पुलाशेजारील हौद आंदोलकांनी फोडला. शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. खासदार धनंजय महाडिक यांनीही संसदेत आवाज उठविला. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे मंत्री महेश शर्मा यांच्याकडे पाठपुरावा करीत कामाची मंजुरी मिळविली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही मंत्री गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता.
पर्यायी पुलाचे ७० टक्के काम होऊनही गेले नऊ महिने काम रखडल्यामुळे कोल्हापूरकरांचा पुरातत्त्व खात्यावर रोष होता. त्याबाबत कोल्हापुरात तीव्र आंदोलन उभारले होते. शिवाजी पुलापासून काही अंतरावर ‘पुरातत्त्व’ची ब्रह्मपुरी टेकडी असून तिच्यावर असंख्य बांधकामे झाली आहेत. ती होताना डोळेझाक करणाऱ्या प्रशासनाने टेकडीपासून दूरवर असणाऱ्या शिवाजी पुलाच्या बांधकामाला मात्र लालफितीची मोहर का चिकटवली, असाही प्रश्न कोल्हापूरच्या आंदोलकांतून विचारला जात होता.
दरम्यान, पावसाळा आणि गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोल्हापुरातील अधिकारी याच पर्यायी शिवाजी पुलाच्या बैठकीसाठी मुंबईच्या वाऱ्या करीत असतानाच केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी साप्ताहिक सुटीदिवशी रविवार, दि. २५ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात येऊन शिवाजी पूल परिसरातील ऐतिहासिक ब्रह्मपुरी टेकडीची परस्पर पाहणी करून निघून गेले.
हे अधिकारी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या मुंबई कार्यालयाकडील असल्याचे समजते. हे अधिकारी काही वेळातच पाहणी करून परत गेल्यानंतर त्याची माहिती महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना समजली. कोल्हापूरच्या आंदोलकांच्या धास्तीला सामोरे जावे लागू नये म्हणूनच या अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात येऊन आपले काम गुपचूप पूर्ण केल्याचे समजते.