कोल्हापुरातील महापूर नियंत्रणासाठी सर्वेक्षण सुरू, चारजणांचे पथक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 18:39 IST2024-12-27T18:39:19+5:302024-12-27T18:39:41+5:30
पुण्यातील संस्था करणार महापुराचा अभ्यास

कोल्हापुरातील महापूर नियंत्रणासाठी सर्वेक्षण सुरू, चारजणांचे पथक
कोल्हापूर : प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीला येणाऱ्या महापुराचा नागरी जीवनावर फारसा परिणाम होऊ नये तसेच वित्तीय नुकसानसुद्धा टाळले जावे यासाठी कराव्या लागणाऱ्या तात्पुरत्या त्याचबरोबर कायमस्वरूपी उपाययोजनांसंदर्भात पुण्यातील एका खासगी संस्थेने सर्वेक्षण सुरू केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून या संस्थेचे चार जणांचे एक पथक सर्व संबंधितांकडून त्याचबरोबर प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती घेत आहे.
पंचगंगा तसेच कृष्णा नदीच्या महापुरामुळे प्रत्येक वर्षी नागरी जनजीवन विस्कळीत होत असते. शेतात, घरात महापुराचे पाणी शिरल्यामुळे शेतीसह प्रापंचिक तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. आठ दहा दिवस नागरिकांना विस्थापित ठिकाणी वास्तव्य करावे लागते. जनावरांची सोय करावी लागते. यामुळे प्रशासनावरसुद्धा मोठा ताण पडतो.
प्रत्येक वर्षीच्या या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारला तात्पुरत्या तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्याकरिता राज्य सरकारने जागतिक बँकेकडून ३,२०० कोटी रुपयांचे कर्जाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी त्यात पुढाकार घेतला आहे.
पंचगंगा तसेच कृष्णा नदीच्या महापुरावर नियंत्रण मिळविण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील याचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी पुण्यातील प्रायमो या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या संस्थेचे चार जणांचे एक पथक गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरात पूरक्षेत्रात पाहणी करून माहिती गोळा करत आहे. महापुरामुळे पर्यावरणीय तसेच सामाजिक परिणाम काय होतात, महापुराचे पाणी कोठेपर्यंत येते, महापूर आल्यानंतर नागरिकांचे स्थलांतर कोठे केले जाते, त्या ठिकाणी त्यांना कशा प्रकारे सुविधा दिल्या जातात, याची माहिती या पथकाकडून घेतली जात आहे.
पूर नियंत्रणाच्या अनुषंगाने सुरू असलेले हे सर्वेक्षण आणखी काही महिने सुरू राहणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल राज्य सरकारला दिला जाईल. त्यानंतर पूरनियंत्रणासंदर्भातील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.