कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात; रेल्वे महाव्यवस्थापकांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 01:42 PM2024-07-23T13:42:02+5:302024-07-23T13:43:18+5:30
''व्यापार, पर्यटनाला चालना देण्यासाठी कोल्हापूर स्थानकातून रेल्वे सेवा सुरू कराव्यात''
कोल्हापूर : कोल्हापूर ते वैभववाडीरेल्वे मार्गासाठी अंतिम टप्प्यातील सर्व्हेक्षण सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी सोमवारी दिली. त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्निनन्सची पाहणी केली.
महाव्यवस्थापक यादव म्हणाले, कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे. त्यामध्ये गगनबावडा परिसरात काम सुरू आहे. काही महिन्यांत हे काम संपेल. या मार्गात घाट विभाग असल्याने जादा निधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान यादव यांनी सोमवारी सकाळी रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
वरिष्ठ अधिकारी रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून का दिली जात नाही, प्रवासी संघटनांनी मागण्यांचे गाऱ्हाणे कोणाकडे मांडायचे, असा प्रश्न अरिहंत जैन फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल, कोल्हापूर रेल्वे पॅसेंजर संघटनेचे शिवनाथ बियाणी यांनी विचारला. त्यावेळी यासंदर्भात चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या व्यापार, पर्यटनाला चालना देण्यासाठी कोल्हापूर स्थानकातून रेल्वे सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी केली. विभागीय रेल्वे प्रबंधक इंदू दुबे उपस्थित होत्या.
या केल्या मागण्या
- कोल्हापूर ते मुंबईदरम्यान दुरान्तो एक्स्प्रेस, वंदे भारतच्या धर्तीवर सुपरफास्ट रेल्वे सुरू करा.
- सह्याद्री एक्स्प्रेस बंद असल्याने कोल्हापूर ते पुणे अशी विशेष रेल्वे सेवा सुरू करा.
- कोल्हापूर ते अहमदाबाद एक्स्प्रेसची सेवा आठवड्यातून तीन वेळा द्या.
- राणी चन्नमा एक्स्प्रेस कोल्हापुरातून पूर्ववत सुरू करा.
- कोल्हापूर ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी.