वैभववाडी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू, रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी कोल्हापुरात दिली माहिती
By संदीप आडनाईक | Published: January 24, 2024 02:26 PM2024-01-24T14:26:38+5:302024-01-24T14:26:59+5:30
वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच: रेल्वे महाव्यवस्थापकांकडून कोल्हापूर स्थानकाची वार्षिक पाहणी
कोल्हापूर : मार्च २०२४-२५पर्यंत पुणे आणि मिरज मार्गावरील दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल असे सांगून गतीशक्ती योजनेतील कोकण रेल्वेला कोल्हापुरातून जोडणाऱ्या वैभववाडी मार्गाचे मोठ्या प्रकल्पाच्या सर्वेक्षण सुरू आहे, तसेच लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची सुरू होईल,अशी माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी बुधवारी कोल्हापुरात दिली.
भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेचे वरिष्ठ अधिकारी राहिलेले यादव यांनी कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सला भेट देऊन वार्षिक तपासणी केली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी होते. यावेळी त्यांनी अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापूरातील रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी केली. सांगली आणि मिरज मार्गावरील काम सहा महिन्यात पूर्ण होईल, वैभववाडी मार्गाचा डीपीआर तयार आहे, यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, रेल्वे बोर्डाच्या मान्यता मिळताच याचे काम सुरू होईल.
वेगाची मर्यादा ताशी १५ किलोमिटर होती, काही तांत्रिक अडचणी दूर होताच आता ताशी ५० किलोमिटर इतकी वेग मर्यादा वाढणार असल्यामुळे रेल्वेचा प्रवास कमी कालावधीत होणार आहे. कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाची हेरिटेज वास्तूला धक्का लागणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले.
यादव सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी विशेष रेल्वेने कोल्हापुरात आले आणि ९.२० ऐवजी १० वाजून २० मिनिटांनी सांगलीकडे मार्गस्थ झाले. त्यांच्यासोबत मुंबई आणि पुण्याहून आलेल्या सुमारे ५० हून अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा ताफा होता. यावेळी अमृत भारत योजना, कामाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी लिनन रुमची आणि कोचिंग डेपोचीही पाहणी केली. जवळील पंचगंगा उद्यानात वृक्षारोपण केले.
या वेळी पुणे विभागीय रेल्वेच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक डॉ. स्वप्निल नीला, मुख्य बांधकाम व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, विद्युत अभियंता माहेश्वरी, विभागीय अभियंता डॉ. विकास श्रीवास्तव, स्टेशन व्यवस्थापक राजन मेहता, मिलिंद वाघुर्लीकर, सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, सुहास गुरव, जयंत ओसवाल उपस्थित होते.
स्मोक-फायर अलार्म यंत्रणेचे प्रात्यक्षिक
कोचिंग डेपोमध्ये उभारलेल्या 'एकलव्य' या स्पेशल बोगीमध्ये नवीन थ्री टायर आणि टू टायर एसी मधील अत्याधुनिक स्मोक आणि फायर अलार्म यंत्रणेचे प्रात्यक्षिक यादव यांना दाखवण्यात आले.