फेरीवाला सर्वेक्षणातील चित्र : शहरातील ७५२ फेरीवाले अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:19 PM2020-03-07T12:19:16+5:302020-03-07T12:21:53+5:30
कोल्हापूर महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांचा सर्व्हे केला असून, याची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ४ हजार १०९ फेरीवाल्यांपैकी तब्बल ७५२ फेरीवाले अपात्र ठरले आहेत. या अपात्र फेरीवाल्यांसह ज्यांचा सर्व्हे झालेला नाही, अशांना महिन्याची मुदत दिली आहे. यानंतर मात्र, संबंधितांवर कारवाई होणार आहे.
कोल्हापूर : महापालिकेने शहरातील फेरीवाल्यांचा सर्व्हे केला असून, याची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ४ हजार १०९ फेरीवाल्यांपैकी तब्बल ७५२ फेरीवाले अपात्र ठरले आहेत. या अपात्र फेरीवाल्यांसह ज्यांचा सर्व्हे झालेला नाही, अशांना महिन्याची मुदत दिली आहे. यानंतर मात्र, संबंधितांवर कारवाई होणार आहे.
कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांना शिस्त लावण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या इस्टेट विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. ४१०९ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. फेरीवाल्यांच्या समितीच्या बैठकीनंतर इस्टेट विभागाने या फेरीवाल्यांची महापालिकेच्या वेबसाईटवर यादी प्रसिद्ध केली आहे.
यामध्ये पात्र, अपात्र फेरीवाल्यांचा समावेश आहे. अपुरी कागदपत्रे देणाऱ्या ७५२ फेरीवाल्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. महिन्यानंतर फेरीवाला समितीसमोर अंतिम फेरीवाला यादी करण्यात येणार आहे. त्यानंतर फेरीवाला झोन निश्चित होणार आहे.
सर्व्हेत अपात्र ठरलेले फेरीवाले तसेच ज्यांचा सर्व्हेच झाला नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रासह इस्टेट विभागाशी संपर्क साधवा. या कामासाठी केवळ महिन्याची मुदत आहे. यानंतर पाच वर्षे सर्व्हे होणार नाही. त्यामुळे नोंद न होणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जाणार आहे.
सचिन जाधव,
इस्टेट अधिकारी
सर्व्हे करणारी कंपनी-
- आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्न्मेंट
- सर्व्हे सुरू - १५ जानेवारी-२०१९
- सर्व्हे केलेले फेरीवाले- ४१०९
- सर्व्हेत पात्र ठरलेले फेरीवाले-३३५७
- अपात्र ठरलेले फेरीवाले- ७५२
आवश्यक कागदपत्र
- रेशनकार्ड
- आधारकार्ड
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र