शाळाबाह्य मुलांचे ४ जुलैला सर्वेक्षण
By admin | Published: June 26, 2015 10:07 PM2015-06-26T22:07:29+5:302015-06-26T22:07:29+5:30
आमदार, खासदारांनी लोकजागृती करण्याची अपेक्षा
इचलकरंजी : शहरातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांची संख्या निश्चित करण्यासाठी ४ जुलैला एकदिवसीय सार्वत्रिक उपक्रम राबविला जाणार आहे. हे सर्वेक्षण नगरपालिका अधिकारी व कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षण मंडळाकडील शिक्षक असे एकत्रित घेतले जाईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दिली.
सहा ते चौदा वर्षे वयोगटातील प्रत्येकास शाळेच्या पटावर नोंदणे अत्यावश्यक आहे. नियमित शाळेत जाणे व त्या बालकाला दर्जेदार शिक्षण देणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र, शाळाबाह्य मुलांच्या संख्येविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. म्हणून मुलांच्या संख्येबाबत असलेला संभ्रम दूर करण्याचा उद्देश शासनाचा आहे, असे सांगून अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार म्हणाल्या, शाळाबाह्य मुलांमध्ये शाळेत न जाणारा किंवा एक महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थित असलेल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याचा यात समावेश होतो.
हा उपक्रम महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास, सार्वजनिक आरोग्य या विभागांमार्फत होत आहे. शाळाबाह्य मुलांच्या नोंदी ४ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरोघरी, बसस्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी करावयाची आहे. त्यासाठी विशेषत: झोपडपट्टी, खेडे, वाड्या, शेतातील वस्त्या व जंगलात वास्तव्य करणाऱ्या घरांचा विचार करावा, असे शासनाने कळविले आहे. (प्रतिनिधी)
आमदार, खासदारांनी लोकजागृती करण्याची अपेक्षा
शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणासाठी लोकचळवळ म्हणून पहावे. या प्रश्नासाठी काम करणाऱ्या संघटना, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे यांच्या अनुभवाचा लाभ या कार्यासाठी घ्यावा. आमदार, खासदार यांनी पदयात्रांद्वारे लोकजागृती करावी. सर्वेक्षण होताच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नवीन सर्वेक्षणामध्ये मिळालेल्या बालकांची आधारकार्ड नोंदणी करून घ्यावी, असेही शासनाने सुचविले आहे.