सूर्यकिरणांचा चरणस्पर्श-अंबाबाई किरणोत्सव आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:30 PM2017-11-08T23:30:51+5:302017-11-08T23:35:09+5:30
कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई किरणोत्सवाला आज, गुरुवारपासून प्रारंभ होत आहे.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई किरणोत्सवाला आज, गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. गेल्या काही वर्षांत ठरलेल्या दिवसांनंतरही किरणोत्सव झाल्याने यंदा बुधवारपासूनच किरणोत्सवाच्या सोहळ्याची पाहणी सुरू झाली. विशेष म्हणजे सायंकाळी ५ वाजून ४४ ते ४६ मिनिटे या दोन मिनिटांच्या कालावधीत किरणांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केला. पूर्वीच्या काळी किरणोत्सव पाच दिवसांचाच असायचा. नंतर तो तीन दिवसांवर आला. आता मात्र पुन्हा किरणोत्सव पाच दिवसांचा जाहीर केला जावा, अशी मागणी अभ्यासकांतून होत आहे.
श्री अंबाबाईचा ९ ते ११ नोव्हेंबर व ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारी अशा रीतीने वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो. पहिल्या दिवशी मावळतीची किरणे अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श, दुसºया दिवशी कमरेपर्यंत व तिसºया दिवशी मूर्तीच्या चेहºयावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून किरणे अंबाबाई मूर्तीच्या चेहºयापर्यंत पोहोचत नसल्याने किरणांच्या मार्गांचा आणि अडथळ्यांचा सातत्याने अभ्यास केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी ठरलेल्या तीन दिवसांनंतर किरणोत्सव झाला; त्यामुळे किरणोत्सवाचा सोहळा पाच दिवसांचा केला जावा व तारखांमध्ये होणाºया बदलांची नोंद घेतली जावी, अशी मागणी अभ्यासकांनी केली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन ठरलेल्या तारखेआधी एक दिवस आणि नंतरचा एक दिवस असे पाच दिवस किरणोत्सव सोहळ्याचा अभ्यास केला जाईल, असे जाहीर केले होते. विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद कारंजकर यांच्यासह विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून किरणोत्सवाचा अभ्यास करीत आहेत. बुधवारी सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी सूर्यकिरणांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केला आणि ५ वाजून ४६ व्या मिनिटांनी किरणे मूर्तीच्या डावीकडे झुकली.
बुधवारी सायंकाळी सूर्यकिरणांनी अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श केला. किरणांची तीव्रता चांगली होती. आर्द्रता आणि धुलिकणही कमी असल्याने किरणोत्सवाची दिशा योग्य होती. वातावरण जर असेच राहिले तर आज, गुरुवारी किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत येतील, अशी अपेक्षा आहे. - प्रा. मिलिंद कारंजकर