सूर्यनारायण कोपले... ‘कूलसिटी’ बहरली!
By admin | Published: May 4, 2015 12:21 AM2015-05-04T00:21:11+5:302015-05-04T00:23:08+5:30
सलग सुट्यांमुळे गर्दी : अंगाची लाहीलाही घालविण्यासाठी हजारो पर्यटक महाबळेश्वरात दाखल
महाबळेश्वर : महाराष्ट्र दिन व शनिवार, रविवार आणि सोमवारी बुध्द पौर्णिमा अशा सलग सुट्या आल्यामुळे पुणे, मुंबई, कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांतून हौसी पर्यटक महाबळेश्वर शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले आहेत. संपूर्ण राज्यात सूर्यनारायण कोपले असल्याने जीवाला गारवा मिळण्यासाठी कूलसिटी पर्यटकांनी बहरू लागली आहे.
हौसी पर्यटक सुट्यांमध्ये महाबळेश्वरमधील निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट देणे पसंत करतात; परंतु मे महिन्यात उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरातील गुलाबी थंडीची मजा लुटण्यासाठी तर मे महिन्यात तिन्ही ऋतूंचा आनंद घ्यायला मिळत असतो. उन्हाळा सुरू झाल्यापासून लाखो पर्यटक देश-विदेशातून महाबळेश्वरला येत असतात.
पुणे-मुंबई कोल्हापूर येथील शालेय परीक्षाचे निकाल लागल्यानंतर व कार्पोरेट क्षेत्रात काम करत असलेली मंडळी सहकुटुंब पर्यटनासाठी महाबळेश्वरात येत असतात.
महाबळेश्वरला येणारे बहुतांश पर्यटक हे प्रतापगड, तापोळा, पाचगणी क्षेत्र, महाबळेश्वर आॅर्थरसीट पॉइंटला येत असतात. तेथील निसर्गरम्य परिसराचा नजराना पाहण्यासारखा असतो. सध्या सायंकाळची थंडी चांगलीच असल्यामुळे धुक्याची चादर पांघरलेले महाबळेश्वर तापोळा, प्रतापगड आर्थरसीट पॉइंट पाहण्यासारखे आहे. महाबळेश्वरला सध्या गर्दीचा हंगाम असल्याने हॉटेल, लॉजचे दर तेजीत आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक आजूबाजूच्या गावातील बंगले किवा वाई, सातारा येत आहेत. दिवसभर महाबळेश्वरमध्ये पर्यटनाचा आनंद घेऊन मुक्कामी पुन्हा हॉटेलला जातात.
वेण्णा लेक नौकाविहार, केट्स पॉइंट, आर्थरसीट पॉइंट विल्सन पॉइंट मुंबई पॉइंट, लॉडविक पॉइंट ही ठिकाणे पर्यटकांनी फुलली आहेत. बाजारपेठत चपला, जाम, मका, पॅटीस, आईस्किम तसेच गरमागरम मका पॅटीस खाण्याचा आनंद लुटत आहेत .
महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना ब्रिटिशकालीन पॉइंटच पाहावे लागतात. ‘भुशी डॅम’च्या कामाचा निधी पालिकेत मंजूर होऊन पडलेले असून, कामे पूर्ण झालेले नाही. ही कामे पूर्ण झालीत तर येणारे पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात होईल. दोन दिवसांऐवजी चार दिवस पर्यटकराजा मुक्काम करेल. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. (प्रतिनिधी)