चारच्या आत खरेदी सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:20+5:302021-07-07T04:30:20+5:30

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या कडक निर्बंधातून पाच दिवसांची शिथिलता दिल्याच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकरांनी रस्त्यावर धाव घेतल्याने रस्तेही गर्दीने ओसंडले. वाहतुकीचा ...

Susat within four | चारच्या आत खरेदी सुसाट

चारच्या आत खरेदी सुसाट

Next

कोल्हापूर : लॉकडाऊनच्या कडक निर्बंधातून पाच दिवसांची शिथिलता दिल्याच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकरांनी रस्त्यावर धाव घेतल्याने रस्तेही गर्दीने ओसंडले. वाहतुकीचा ताण आल्याने शहरातील मुख्य मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलही सुरू झाल्याने गर्दीत आणखीन भर पडली. कोरोनाला मानगुटीवर घेऊनच कोल्हापूरकरांनी मंगळवारी दुपारी चारपर्यंत मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. खाऊगल्ली ते सराफ दुकाने सर्वत्र लोक तुटून पडल्यासारखे चित्र होते, याला अपवाद फक्त हॉटेलचा राहिला. तेथे केवळ पार्सल सेवा असल्याने गर्दी नव्हती.

व्यापाऱ्यांच्या आग्रहास्तव शुक्रवारपर्यंत पाच दिवसांसाठी सरसकट दुकाने सुरू करण्याची विशेष सवलत कोल्हापूर शहरापुरती मिळाली आहे. अनावश्यक गर्दी करणार नाही, नियमांचे पालन करणार, असे व्यापाऱ्यांनी सांगून देखील प्रत्यक्षात सोमवारपासून दुकाने सुरू झाल्यापासून कोरोना आहे, लॉकडाऊन आहे, याचाच विसर पडल्यासारखी शहरात स्थिती आहे. मंगळवारीदेखील राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, गुजरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड या प्रमुख व्यापारी मार्गांवर हेच चित्र कायम होते. जिकडे नजर टाकेल तिकडे गर्दीच गर्दी दिसत होती. विशेषत: कपड्यांच्या दुकानात गर्दी जास्त दिसत होती. याशिवाय भांडी, सौंदर्य प्रसाधनासह किरकोळ वस्तूंच्या दुकानातही बऱ्यापैकी वर्दळ होती.

जीवनावश्यक वगळता अन्य दुकाने अडीच महिन्यांपासून बंद असल्याने बरेचसे साहित्य मिळण्यात अडचणी येत होत्या. मागच्या दाराने गेल्या महिनाभरापासून व्यापारी मागणीप्रमाणे ग्राहकाला माल पुरवत असले तरी त्यालाही मर्यादा येत होत्या.

ताेंडाला मास्क, पण सोशल डिस्टन्सचे काय

सर्व नियम पाळण्याच्या अटीवरच प्रशासनाने शिथिलता दिली असलीतरी कोरोना गेलाच आहे, असे गृहीत धरून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू असल्याचे चित्र जागोजागी दृष्टीस पडत आहे. तोंडाला मास्क आहे, पण सोशल डिस्टन्सचा मात्र फज्जा उडाल्यासारखी परिस्थिती आहे. कुठेही विशिष्ट रिंगण आखून प्रवेश दिला जात नाही. सरसकट दुकानात प्रवेश दिला असून बऱ्याच ठिकाणी सॅनिटायझरदेखील ठेवलेले दिसत नाही.

हातगाडी, छोटे व्यावसायिक आनंदले

गेल्या दोन महिन्यांपासून हातगाडी, छोटे व्यवसाय चालवणाऱ्यांची दुकाने बंद असल्याने घरात बसण्याशिवाय पर्याय नव्हता. भेलपुरी, पाणीपुरीचे ठेले चालवणाऱ्यांना व्यवसाय बंदच ठेवावा लागला होता. ही दुकाने सुरू झाल्याने या छाेट्या विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला आहे. चारपर्यंत सवलत असलीतरी देखील निदान रोजच्या जगण्यापुरते तरी पैसे मिळतील, अशी या विक्रेत्यांची भावना आहे.

खाऊगल्या हाऊसफुल्ल

कोल्हापूर तसे खाण्यावर प्रेम करणारे, त्यातही रस्त्यावर उभे राहून खाण्यातील मजा चाखावी ती कोल्हापूरकरांनीच. या आवडीमुळे कोपऱ्या-कोपऱ्यावर जिभेचे चोचले पुरवणारी खाद्यानाच्या गाड्या, दुकाने उभी राहिली. लॉकडाऊन काळात कडक निर्बंधांमुळे केवळ पार्सलची सोय सुरू होती, पण प्रत्यक्षात जागेवर जाऊन खायला मिळू लागल्याने या दुकानांसमोरी गर्दीही वाढली आहे. मक्याच्या कणसापासून ते सॅण्डविच, पिझ्झापर्यंत लोक ताव मारताना दिसत होते.

हॉटेलमधून केवळ पार्सलच

छोटी-मोठी दुकाने सुरू झाली तरी हॉटेल बंदच आहे. पार्सल सेवा सुरू असल्याचे बोर्ड दारात लावण्यात आले आहेत, पण आता बसण्याची सोय ठेवलेली नसल्यामुळे ग्राहकही तिकडे फारसे फिरकत नाही. हॉटेलचे पार्सल ऑनलाईन मागवण्याला प्राधान्य दिले जात असल्याने ते पुरवणाऱ्या कंपन्याचे प्रतिनिधी मात्र हॉटेलसमोर दिसतात. बाकी सर्व शांतता आहे.

०६०७२०२१-कोल-सराफ गुजरी

कोल्हापूर : लॉकडाऊन नियमात शिथिलता दिल्याने लोकांनी सुवर्ण खरेदीकडे मोर्चा वळवला, मंगळवारी दिवसभर गुजरीत गर्दीच गर्दी दिसत होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Susat within four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.