अध्यक्षपदासाठी सुशांत शेलार यांची खेळी : मेघराजराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 07:25 PM2020-11-27T19:25:33+5:302020-11-27T19:27:40+5:30
cinema, chitrpatmahamandal, kolhapurnews अभिनेते सुशांत शेलार यांनी अध्यक्षपदासाठी माझ्याविरोधात अविश्वास ठरावाची खेळी खेळली. मात्र असा ठराव करण्याची तरतूद महामंडळाच्या घटनेतच नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी हे सगळे एकत्र आले आहेत. चित्रपट महामंडळाच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी केवळ मला खाली खेचण्यासाठी कार्यकारिणीची बैठक घेतली गेली, असा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी शुक्रवारी केला.
कोल्हापूर : अभिनेते सुशांत शेलार यांनी अध्यक्षपदासाठी माझ्याविरोधात अविश्वास ठरावाची खेळी खेळली. मात्र असा ठराव करण्याची तरतूद महामंडळाच्या घटनेतच नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी हे सगळे एकत्र आले आहेत. चित्रपट महामंडळाच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी केवळ मला खाली खेचण्यासाठी कार्यकारिणीची बैठक घेतली गेली, असा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी शुक्रवारी केला.
माजी अध्यक्ष भोसले यांनी अविश्वास ठरावाविरोधात न्यायालयात दाद मागणार असे जाहीर केल्याने आठ संचालकांनी शुक्रवारी कॅव्हेट दाखल केले.
भोसले यांनी निवेदनाद्वारे भूमिका मांडली. आजपर्यंत सगळ्याच ठरावांना सर्वानुमते मंजुरी असताना मी कोणता मनमानी कारभार केला, महाकलामंडलबाबत सर्वांना ग्रुपवर विचारण्यात आले, त्यावेळी काहींनी सकारात्मक निर्णय दिला; तर काहीजण गप्प बसले.
मग चित्रपट महामंडळ कलामंडलच्या दावणीला बांधले गेले, हा आरोप कशाच्या जोरावर करण्यात आला? राज्यपालनियुक्त आमदारकीसाठी सगळ्याच संचालकांनी माझ्या नावाने बहुमताने ठराव केला. मग आत्ताच त्याचा कांगावा का केला जात आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
महामंडळाच्या घटनेत अविश्वास ठरावाची तरतूद नाही, नैसर्गिक न्यायाने हा हक्क मान्य केला तरी अध्यक्षांना किमान सात दिवस आधी नोटीस देणे गरजेचे आहे.
यमकर यांनी स्वत: बँकेत भरलेला धनादेश, बाळा जाधव यांचे धोक्यात आलेले संचालकपद, सतीश रणदिवे व सतीश बिडकर हे मागील कार्यकारिणीच्या १० लाख ७८ हजार रुपयांच्या प्रकरणात दोषी ठरले आहेत. वर्षा उसगावकर, निकिता मोघे यांचा जादा भत्त्याचा विषय ऐरणीवर आल्याने स्वार्थ सांभाळण्यासाठीच सगळे एकत्र आल्याची टीका राजेभोसले यांनी केली.