ग्रोबझ फसवणुकीतील संशयिताची कळंबा कारागृहात धुलाई, गुंतवणूक केलेल्या पैशांचा जाब विचारत बेदम मारहाण

By उद्धव गोडसे | Published: June 28, 2023 12:24 PM2023-06-28T12:24:50+5:302023-06-28T12:26:52+5:30

जामिनावर बाहेर आलेल्या मोक्कातील एका गुंडाला कारागृहातूनच फोन करून त्याने मध्यस्थी करण्याची विनंती केली

Suspect in Grobz fraud brutally beaten in Kalamba jail kolhapur | ग्रोबझ फसवणुकीतील संशयिताची कळंबा कारागृहात धुलाई, गुंतवणूक केलेल्या पैशांचा जाब विचारत बेदम मारहाण

ग्रोबझ फसवणुकीतील संशयिताची कळंबा कारागृहात धुलाई, गुंतवणूक केलेल्या पैशांचा जाब विचारत बेदम मारहाण

googlenewsNext

उद्धव गोडसे

कोल्हापूर : ग्रोबझ कंपनीद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कळंबा कारागृहात रवानगी झालेला संशयित आरोपी विश्वास निवृत्ती कोळी याला कारागृहात आठ ते दहा तरुणांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणारे तरुण दंगलीच्या गुन्ह्यात कळंब्यात न्यायालयीन कोठडीत होते. विशेष म्हणजे कोळी हा कारागृहात मोबाइल वापरत असून, त्याने मध्यस्थीसाठी मोक्काच्या कारवाईतून सुटलेल्या एका गुंडाची मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे.

गुंतवणुकीवर कमी वेळेत दामदुप्पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ग्रोबझ मल्टिट्रेड कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना ९ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला. या गुन्ह्यातील संशयित विश्वास कोळी सध्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. शहरात सात जूनला घडलेल्या दंगलीतील काही संशयित तरुणांची रवानगी कळंब्यात न्यायालयीन कोठडीत झाली.

त्यावेळी ग्रोबझमधील कोळी आणि हे तरुण एकाच बराकमध्ये होते. यातील काही तरुणांनी कोळीद्वारे ग्रोबझमध्ये गुंतवणूक केली होती. त्यांनी कोळीला गुंतवणूक केलेल्या पैशांचा जाब विचारत कारागृहातच बेदम मारहाण केली. अखेर कोळीने जामिनावर सुटल्यानंतर पैसे परत देण्याची कबुली तरुणांना दिली.

कारागृहात मोबाइलचा वापर

कारागृहातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोळी कारागृहात मोबाइल वापरत आहे. मोबाइलद्वारे त्याचा नातेवाईक आणि काही एजंटशी नियमित संपर्क असल्याचा प्रकार समोर आला. याबाबत न्यायालयीन कोठडीतील तरुणांनी कारागृहातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, न्यायालयातही तक्रार अर्ज दिला जाणार आहे.

कोळीकडून मोक्कातील गुंडाची मदत

न्यायालयीन कोठडीतील कोळीने कारागृहात मोक्कातील एका गुंडाशी संधान साधले. गेल्याच आठवड्यात जामिनावर बाहेर आलेल्या त्या गुंडाला कारागृहातूनच फोन करून त्याने मध्यस्थी करण्याची विनंती केली. गुंतवलेले पैसे परत मागणाऱ्यांना गुंडांची भीती घालण्याचे नियोजन कोळी याने केल्याची माहिती काही गुंतवणूकदारांनी दिली.

Web Title: Suspect in Grobz fraud brutally beaten in Kalamba jail kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.