पाच मारेकरी असल्याचा संशय
By admin | Published: June 7, 2015 01:24 AM2015-06-07T01:24:00+5:302015-06-07T01:24:00+5:30
फुटेज तपासणीस उच्च तंत्रज्ञानाची मदत
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर दोन मोटारसायकलींवरून आलेल्या पाच मारेकऱ्यांनी हल्ला केला असण्याची शक्यता ठळक झाली आहे. त्यांच्यावर पाळत ठेवून हा हल्ला झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत.
दरम्यान, हल्ल्यावेळी घटनास्थळी समोर असलेल्या सरस्वती चुणेकर विद्यालयातून जे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, त्याची तपासणी करण्यासाठी विविध संस्थांची मदत घेण्यात येत असल्याचे एस.आय.टी. पथकाचे प्रमुख संजयकुमार यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले. आरोपी दोनपेक्षा जास्त असावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजयकुमार यांनी सांगितले की, ‘शाळेतील कॅमेऱ्यामध्ये पानसरे दाम्पत्य चालत गेल्यानंतर काही सेकंदांत मोटारसायकलस्वार जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हीच मोटारसायकल त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सुभाषनगरला धीरज कन्स्ट्रक्शनचे काम सुरू असून त्यांच्या सीसीटीव्हीमध्ये वेगाने जात असल्याचे दिसते आहे. तिथे एका मोटारसायकलीवरून तिघे व दुसरीवरून दोघे जात असल्याचे दिसते. हे फुटेज अस्पष्ट होते; परंतु आम्ही ते तंत्रज्ञानाची मदत घेऊन अधिक स्पष्ट करून घेतले आहे. या दोन कॅमेऱ्यांतील मोटारसायकलस्वार एकच असल्याच्या ८० टक्के निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत. अजूनही त्यामध्ये स्पष्टता येऊ शकते. यासाठी पुणे दूरदर्शन, सिनेमासाठी असे तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपन्या व पुण्यातील फिल्म अर्काईव्हजची मदत घेऊन त्याद्वारे काही धागेदारे हाती लागतात का, असा प्रयत्न करणार आहोत.
ते म्हणाले, आतापर्यंत आम्ही जी माहिती उपलब्ध होईल तिची छाननी केली आहे. निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचीही मदत घेतली आहे. त्याशिवाय गोवा पोलीस, बिदर, बेळगावचे पोलीसप्रमुख व गुजरात पोलिसांचीही मदत या तपासासाठी घेतली आहे. तपास गतीने व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी विविध यंत्रणांची मदत घ्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आम्ही आवश्यक त्या सर्व यंत्रणांची मदत घेऊन तपास करीत आहोत.
मोटारसायकलबाबत संशय
संशयित जी हिरो होंडा एसएस मोटारसायकल मिळून आली आहे, तिची सीट व शॉक अब्सॉर्बर वेगळे आहेत. तशी सीट कोल्हापुरात कुणी तयार करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
टोलनाक्यावरील चित्रीकरण
हल्ला झाला त्या काळातील ‘आयआरबी’च्या सर्व टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज आम्ही त्यावेळीच ताब्यात घेतले आहे. हा डाटा जास्त असल्याने सहा-सात लोक त्याची पाहणी करीत असल्याचे संजयकुमार यांनी सांगितले.
कोल्हापुरी शिवी...
हल्लेखोरांनी पानसरे यांना हल्ल्यापूर्वी काही वेळ ‘मोरे यांचे घर कुठे आहे?’ असे विचारले होते व त्यांनी कोल्हापुरी भाषेत शिवी हासडली होती, असेही तपासात निष्पन्न झाल्याचे संजयकुमार यांनी सांगितले.