कळंबा कारागृहातील कैद्याच्या खूनाचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 06:15 PM2020-12-02T18:15:50+5:302020-12-02T18:19:32+5:30
Jail, Death, Kolhapurnews, Crimenews, Police, चार दिवसापूर्वी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याच्या झालेल्या मृत्यूबाबत प्राथमिक वैद्यकिय अहवालानुसार पोलिसांनी खूनाचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. उमेश राजाराम सामंत (वय ५३ रा. परुळे, मांजर्डेवाडी, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग) असे त्या मृत कैद्याचे नाव आहे. या संशयावरुन त्याचे दोन सहकारी कैदी चौकशीच्या फेऱ्यात आडकले आहेत.
कोल्हापूर : चार दिवसापूर्वी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्याच्या झालेल्या मृत्यूबाबत प्राथमिक वैद्यकिय अहवालानुसार पोलिसांनी खूनाचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. उमेश राजाराम सामंत (वय ५३ रा. परुळे, मांजर्डेवाडी, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग) असे त्या मृत कैद्याचे नाव आहे. या संशयावरुन त्याचे दोन सहकारी कैदी चौकशीच्या फेऱ्यात आडकले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पत्नीच्या हत्येच्या आरोपावरुन उमेश सामंत हा २०१३ पासून कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सद्या तो खुल्या कारागृहातील जनावरांचा गोठा व शेती देखभालीची कामे करत होता. रविवारी दुपारी चक्कर येऊन पडल्याने त्याला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
शवविच्छेदनात छातीच्या दोन्हीही बाजूला मार लागल्याने बरगड्या तुटून अतिरक्तसत्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल बुधवारी सकाळी पोलिसांना प्राप्त झाल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितली. त्यामुळे पोलिसांनी खूनाचा संशय व्यक्त केला. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक जाधव यांनी थेट कळंबा करागृहात जाऊन घटनास्थळाची पहाणी करुन काही कर्मचारी, कैद्यांची चौकशी केली.
दोन कैदी संशयाच्या भोवऱ्यात
शवविच्छेदन अहवालानुसार खूनाचा संशय बळावल्याने पोलिसांनी कारागृहातील पाच कर्मचारी तसेच त्याच्या संपर्कातील नऊ कैद्यांची कसून चौकशी केली, यामध्ये मृत उमेश सामंत याच्यासोबत खुल्या कारागृहात राहणाऱ्या दोघां कैद्यांचा समावेश आहे. या दोघां संशयिताकडून चौकशीत विसंगत उत्तरे आल्याने त्यांच्यावर खूनाचा संशय बळावला आहे. पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यत चौकशी सुरु होती.
पत्नीच्या हत्येबद्दल जन्मेठेपेची शिक्षा
उमेश सामंत हा एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून नोकरीस होता. त्याचा मामाच्या मुलीशीच विवाह झाला होता. त्याला एक मुलगा व एक मुलगी होते. मार्च २०१२ मध्ये निवती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परुळे, मांजर्डेवाडी (ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग) येथे पत्नीच्या हत्येबद्दल त्याला अटक झाली होती. सिंधुदुर्ग न्यायालयाने त्याला मार्च २०१३ जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कळंबा कारागृहात तो शिक्षा भोगत होता.
मुलांनी नाकारले, पोलिसांनीच उरकला अंत्यविधी
मृत उमेश सामंत याचे त्याच्या मामाच्या मुलीशीच विवाह झाला होता. सामंत याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना रविवारीच कळवले. सामंत हा शिक्षा भोगत असताना त्याची दोन्ही मुले मामाकडेच वाढली. त्यामुळे दोन मुलांसह मामा हे मृताबाबत कायदेशीर बाबी पूर्ण करण्याकरीता मंगळवारी पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी मुलांनी सह्या करुन पूर्तता केली, पण आमच्या पित्यानेच आईचा खून केला व आम्ही मामाकडेच वाढलो असे सांगून पित्याचा मृतदेह घेण्यास दोन्ही मुलांनी नकार दिला, त्यामुळे पोलिसांनीच त्या मृतदेहाचा अंत्यविधी उरकावा लागला.