कोल्हापूर जिल्ह्यात आढळला झिका व्हायरसचा संशयित रुग्ण, औषध फवारणी सुरु; यंत्रणा सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 01:43 PM2023-09-04T13:43:07+5:302023-09-04T13:46:57+5:30
इतर सात संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले
इचलकरंजी : शहरातील झिका व्हायरस संशयित रुग्णाच्या घरी आणि परिसरात महापालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली. इतर सात संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
काडापुरे तळ येथील ३८ वर्षीय झिका व्हायरस संशयित असलेला रुग्ण रत्नागिरी येथे गेला होता. त्यानंतर त्याला ताप आला. सध्या या रुग्णाची प्रकृती चांगली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. रविवारी सकाळी संबंधित रुग्णाच्या घरातील साहित्य, पाण्याची टाकी, गटार आणि परिसरात महापालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली.
इतर सात रुग्णांचे नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. संबंधित रुग्णांची प्रकृती उत्तम आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. डासांपासून सावधगिरी बाळगावी. आपल्या परिसरात औषध फवारणी करून घ्यावी. फ्रिज, मोकळे डबे, टायर यामध्ये पाणी साचले असल्यास ते काढून टाकावे. परिसर आपला स्वच्छ ठेवावा, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी केले आहे.