कोल्हापुरात ओमायक्रॉनचा संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 03:10 PM2021-12-13T15:10:18+5:302021-12-14T14:02:11+5:30

कोल्हापुरात ओमायक्रॉनचा संशयित रुग्ण सापडल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली.

Suspected patient of Omycron in Kolhapur | कोल्हापुरात ओमायक्रॉनचा संशयित

कोल्हापुरात ओमायक्रॉनचा संशयित

googlenewsNext

कोल्हापूर : शहरातील रमणमळा परिसरात ऑस्ट्रेलियातून आलेल्या पाच व्यक्तींपैकी दहा वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने महानगरपालिका आरोग्य विभागाची यंत्रणा सक्रिय झाली. संबंधित रुग्ण परदेशातून आला असल्यामुळे त्याची शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे ओमायक्रॉन संशयित म्हणून तशी चाचणी करण्यासाठी सोमवारी त्या मुलाचा स्वॅब पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे.

मूळचे कोल्हापूरचे असलेले तसेच व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पाच व्यक्ती दि. ३ डिसेंबर रोजी भारतात आल्या. विमानतळावर या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यावेळी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर त्यांना विमानतळावरून सोडण्यात आले. कोल्हापूर शहरात या पाचही व्यक्ती पोहचल्यानंतर त्यांची माहिती राज्य आरोग्य यंत्रणेने महानगरपालिका प्रशासनास कळविली. दि. ८ डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना गृहअलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

कोल्हापुरातील शासकीय प्रयोगशाळेने या सर्वांचे अहवाल सोमवारी दिले. त्यापैकी चौघांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे तर दहा वर्षाच्या मुलाचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. परदेशातून येणाऱ्या व्यक्तीपैकी कोणी पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यावर ओमायक्रॉन संशयित समजून खबरदारी घ्यावी व उपचार करावेत, अशा सूचना आहेत. त्यामुळे मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिका आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्याचा स्वॅब पुढील तपासणीकरिता पुण्यातील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. संबंधित कोरोना बाधित मुलास दुपारनंतर शहरातील एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला कोणतही विशेष लक्षणे आढळून आलेली नाहीत.

संपर्कातील आठ व्यक्तींच्या चाचण्या

महापालिकेचे आरोग्य पथक संबंधित रुग्णाच्या घरी पोहचले. त्यांनी तातडीने मुलाच्या पालकांच्या सहकार्याने त्यास खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तसेच या मुलाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या आसपासच्या आठ व्यक्तींची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यातील पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर तिघांचे स्वॅब तपासणी अहवाल आज, मंगळवारपर्यंत येईल, असे सांगण्यात आले.

वडील डॉक्टर असल्याने खबरदारी

कोरोनाबाधित आढळलेल्या मुलाचे वडील डॉक्टर असल्याने त्यांनी येथे आल्यापासून पूर्ण खबरदारी घेतली होती. संपूर्ण कुटुंब गृहअलगीकणात होते. ऑस्ट्रेलिया हा देश ओमायक्रॉनच्या हाय रिस्कमध्ये मोडत नाही. तरीही खबरदारी म्हणून सर्व उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन महापालिका आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी केले आहे.

Web Title: Suspected patient of Omycron in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.