‘क्रिप्टो करन्सी’तील फसवणूक दीड कोटीवर, संशयित संघमित्राची कारागृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:29 AM2022-03-10T11:29:39+5:302022-03-10T11:30:03+5:30
संशयित सचिन अर्जुन संघमित्रा याच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे आणखी १७ गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदवल्या
कोल्हापूर : क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवून त्याच्या दामदुपटीचे आश्वासन देऊन गंडा घातल्याप्रकरणी अटक केलेला संशयित सचिन अर्जुन संघमित्रा (वय ४२, रा. विचारेमाळ, कोल्हापूर) याच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे आणखी १७ गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदवल्या. त्यामुळे फसवणुकीची व्याप्ती वाढली असून ती १ कोटी ६८ लाखापर्यंत पोहोचली आहे. तक्रारीचा ओघ अद्याप वाढतच आहे. न्यायालयाने त्याचा जामीन नाकारल्याने त्याची कारागृहात रवानगी केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फॉरेक्स क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून पैसे दामदुप्पट करून देतो म्हणून संशयित सचिन संघमित्रा याने विचारेमाळ येथील सिध्दांत देवानंद फाळके याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून १६ लाख ५० हजार रुपये घेतले. पण गुंतवणुकीच्या नावाखाली घेतलेल्या पैशाचा परतावा अगर मुद्दल परत न देता फसवणूक केली.
याबाबत फाळके याने दिलेल्या तक्रारीनुसार शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंदवला. पण गुन्ह्याची व्याप्ती पाहता हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. पो. नि. श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास करून संशयित संघमित्राला दि. २४ फेब्रवुारीला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली होती.
पोलिसांच्या आवाहनानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे आणखी संघमित्राविरोधात १७ जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीची व्याप्ती वाढून ती १ कोटी ६८ लाखापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे तक्रारींचा ओघ वाढतच आहे. संघमित्रा याचा जामीन न्यायालयाने बुधवारी नाकारला. त्यानुसार त्याची कारागृहात रवानगी केली.