मुख्य लेखापरीक्षक वर्षा परीट यांना निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:01+5:302021-07-15T04:18:01+5:30
कोल्हापूर : घरफाळा घोटाळाप्रकरणी सादर झालेला चौकशी अहवालावर कोणतीच कार्यवाही न करता घोटाळ्यातील दोषींना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य लेखा ...
कोल्हापूर : घरफाळा घोटाळाप्रकरणी सादर झालेला चौकशी अहवालावर कोणतीच कार्यवाही न करता घोटाळ्यातील दोषींना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य लेखा परीक्षक वर्षा परीट यांनाच त्वरित निलंबित करावे, अशी मागणी बुधवारी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी एका निवेदनाद्वारे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
महापालिकेतील तीन कोटी १४ लाखांच्या कथित घरफाळा घोटाळा प्रकरणात चौकशी समितीने अंतिम अहवाल प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे सादर केला होता. या अहवालावर मुख्य लेखापरीक्षक वर्षा परीट यांच्याकडे हा अहवाल पाठवून निश्चित करण्यात आलेल्या रकमेचे लेखापरीक्षण तीन दिवसात करून आपल्या शिफारशीसह त्वरित अहवाल पाठवा, असे आदेश बलकवडे यांनी २३ जून रोजी दिला. परंतु घोटाळ्यात सापडलेल्या दोषी अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी गेली २१ दिवस त्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. वर्षा परीट यांनी प्रशासकांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे शेटे यांनी म्हटले आहे.
परीट यांना मी सहा वेळा प्रत्यक्ष भेटून या घोटाळ्याच्या अहवालात लक्ष घाला, असे आवाहन केले. पण मी बघते यापलिकडे त्यांनी काहीच केले नाही. दोषींना वाचविण्याचा परीट यांचा प्रयत्न असल्याचा आरोप शेटे यांनी केला आहे.