१ कोटी लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसाला दोन दिवसाची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 05:47 PM2022-08-24T17:47:20+5:302022-08-24T17:59:05+5:30
शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे तिवडे याने एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती.
कोल्हापूर : १ कोटी लाचेची मागणी करणाऱ्या निलंबित पोलीस नाईक जॉन विलास तिवडेला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे तिवडे याने एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. याच तिवडेवर सप्टेंबर २०२० मध्ये नात्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो दोन वर्षापासून फरार होता. कुपवाड पोलिसांनी कर्नाटक सीमेवर त्याच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यामध्ये तो न्यायालयीन कोठडीत होता.
शाहुपुरी पोलिसांनी त्याला लाच प्रकरणातील गुन्ह्यात कळंबा कारागृहातून आज, ताब्यात घेतले. तिवडेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
नेमकं प्रकरण असे - तक्रारदाराचे शेत जमिनीबाबत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे, खंडपीठ पुणे येथे दावा सुरु आहे. दाव्याचा निकाल प्रशासकीय सदस्य माजी जिल्हाधिकारी माने यांना सांगून तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्याचे सांगितले. त्यासाठी तुमच्या विरुध्द पार्टींने एक कोटी देण्याची तयारी दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील तयारी करा असे सांगत तिवडे यांने एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर पथकाने लाचेच्या मागणीबाबत दि.२२ मार्च २०२२ रोजी पडताळणी केली. या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीस नाईक जॉन तिवडे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात ६ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.