घनवटसह सात पोलिस निलंबित
By admin | Published: April 19, 2017 12:50 AM2017-04-19T00:50:26+5:302017-04-19T00:50:26+5:30
खातेनिहाय चौकशीचे आदेश : वारणानगरातील चोरी प्रकरण
सांगली/कोल्हापूर : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील शिक्षक कॉलनीतील सव्वानऊ कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सध्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासह सहा पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. या सर्व पोलिसांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी घनवट यांना, तर चंदनशिवेंसह सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, कुलदीप कांबळे व रवींद्र पाटील यांना सांगलीचे जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी निलंबित केले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात सव्वानऊ कोटी रुपयांची चोरी व अपहार असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सर्वजण दुसऱ्यादिवशी म्हणजेच सोमवारी ड्युटीवर हजर राहिले नाहीत.
कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा अहवाल मंगळवारी सांगली पोलिस दलास मिळाला. या अहवालाच्या आधारे पोलिसप्रमुख शिंदे यांनी चंदनशिवेसह सहा पोलिसांना निलंबित केल्याचा आदेश जारी केला आहे. (प्रतिनिधी)
विश्वनाथ घनवट याचा अहवाल
सांगलीचे जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे यांनी पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट याच्याबाबतचा अहवाल कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सादर केला होता. या अहवालाच्या आधारे नांगरे-पाटील यांनी रात्री उशिरा घनवट यालाही निलंबित केले. घनवट याची सांगली जिल्ह्यात चार वर्षाची सेवा पूर्ण होत आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण, मिरज गांधी चौक येथे त्याची सेवा झाली आहे. सध्या त्याच्याकडे गुंडाविरोधी पथकाचा कार्यभार होता.