अनुपस्थित दोन कर्मचारी निलंबित
By admin | Published: June 16, 2015 11:44 PM2015-06-16T23:44:32+5:302015-06-17T00:39:39+5:30
इचलकरंजी पालिका : चौदा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश
इचलकरंजी : शहरात मंगळवारी सकाळी कचरा उठावाची मोहीम राबविताना नगरपालिकेचे कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच आरोग्य व स्वच्छता विभागाकडील सफाई कर्मचारी सातत्याने गैरहजर राहत असल्याने १४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची कारवाई सुरू करण्याचे आदेश मुख्याधिकारी सुनील पवार यांनी दिले.
मंगळवारी सकाळी प्रभाग क्रमांक १३ मध्ये स्वच्छतेची विशेष मोहीम राबविताना मुख्याधिकारी सुनील पवार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार व आरोग्य निरीक्षक सयाजी चव्हाण यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी २७ पैकी २२ कर्मचारी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले. यापैकी विशाल अशोक नाईक व दीपक श्रीरंग कांबळे हे वारंवार गैरहजर राहत असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले, तर अन्य अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बिनपगारी रजा टाकण्याचे आदेश मुख्याधिकारी पवार यांनी कामगार अधिकारी विजय राजापुरे यांना दिले.
दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांपैकी १४ जण वारंवार अनुपस्थित राहत असल्यामुळे त्यांच्यावर बडतर्फ करण्याचा प्रस्ताव ठेवून त्यांचा चौकशी अहवाल तयार करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी कामगार अधिकाऱ्यांना दिले. आता अन्य खात्यांतील कर्मचाऱ्यांवरसुद्धा कसुरीबद्दल कारवाई करण्यात येईल, असेही मुख्याधिकारी पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पंचवीस टन कचऱ्याचा उठाव
इचलकरंजी : शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये मंगळवारी कचरा उठावाची विशेष मोहीम राबवली. अवघ्या पाच तासांत सुमारे २५ टन कचरा उचलण्यात आला. तत्पूर्वी, मुख्याधिकारी सुनील पवार, आरोग्य अधिकारी सुनीलदत्त संगेवार, नगरसेवक संतोष शेळके, नगरसेविका आक्काताई कोटगी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ३५ कर्मचारी व पाच वाहनांच्या मदतीने ही मोहीम राबवली.
प्रभाग क्रमांक १३ चा मक्ता मार्च महिन्यात संपल्याने एप्रिलपासून पालिका कर्मचाऱ्यांमार्फत सफाई व कचरा उठाव केला जात होता; पण अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तेथे स्वच्छता होत नव्हती. वारंवार निवेदने देऊनसुद्धा कचरा उचलला जात नसल्याने नगरसेवक शेळके यांनी उपोषण केले होते. त्यानंतरसुद्धा कारवाई झालेली नाही. म्हणून अखेर सोमवारी नगरसेवक शेळके, तमन्ना कोटगी, रवी लोहार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता व कचरा उठावाची मोहीम राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मुख्याधिकारी पवार व आरोग्य अधिकारी डॉ. संगेवार, आरोग्य निरीक्षक सयाजी चव्हाण, आदींनी नगरसेवकांसह कुडचे मळा, आवाडे मळा, वाढीव वसाहत, बाळनगर, आदी व्यापक परिसराची पाहणी केली आणि दोन्ही प्रभागांतील मिळून कर्मचारी एकत्रित करून ही मोहीम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)
लाचखोर शिपायाचे निलंबन
दोन आठवड्यांपूर्वी असेसमेंट दाखल्यावरील नावात बदल करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बाळू चंदर कांबळे या पालिकेच्या शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडले होते. आता त्याला ९ जूनपासून निलंबित करण्याचे निर्देश मुख्याधिकारी पवार यांनी मंगळवारी दिले. फेब्रुवारी २०१३ मधील शासकीय परिपत्रकाप्रमाणे हे निर्देश दिले असल्याचे पवार यांनी सांगितले.