वीज बिल अफरातफरप्रकरणी वायरमन संदीप मेथे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:25 PM2019-07-10T13:25:42+5:302019-07-10T13:26:15+5:30
ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलात अफरातफर केल्याप्रकरणी वायरमन संदीप मेथे याच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. केर्ली, (ता. करवीर) येथील ग्रामस्थांकडून आलेल्या तक्रारीनंतर महावितरणचे ग्रामीण अभियंता एस. एस. रानभरे यांनी ही कारवाई केली आहे. उपअभियंता व्ही. एस. सपाटे यांनी दिलेल्या चौकशी अहवालानुसार ही कारवाई झाली आहे.
कोल्हापूर : ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलात अफरातफर केल्याप्रकरणी वायरमन संदीप मेथे याच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. केर्ली, (ता. करवीर) येथील ग्रामस्थांकडून आलेल्या तक्रारीनंतर महावितरणचे ग्रामीण अभियंता एस. एस. रानभरे यांनी ही कारवाई केली आहे. उपअभियंता व्ही. एस. सपाटे यांनी दिलेल्या चौकशी अहवालानुसार ही कारवाई झाली आहे.
केर्ली, सोनतळी, रजपूतवाडी येथील ग्रामस्थांकडून महावितरणकडे नियमितपणे वीज बिलांचा भरणा होतो. नेहमीप्रमाणे वायरमन संदीप मेथे याच्याकडेच ही रक्कम दिली जाते. त्याच्या पावत्याही मिळत होत्या; पण एप्रिलपासून बिल भरूनदेखील पावत्या देण्यास वायरमन मेथे हा टाळाटाळ करत होता. यामुळे शंका आल्याने ग्रामस्थांनी महावितरणकडे याबाबत चौकशी केली असता, बिलेच जमा न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांनी तत्काळ महावितरणकडे तक्रार नोंदविली.
या तक्रारीनुसार उपअभियंता व्ही. एस. सपाटे यांनी चौकशी केली असता, मेथे याच्याकडून रकमेचा भरणा बँकेत जमा झाला नसल्याचे स्पष्ट झाले. तीन गावांतील दोन महिन्यांतील बिलांची रक्कम मेथे याने आपल्याकडेच ठेवली आहे. हे सिद्ध झाल्यानंतर सपाटे यांनी ग्रामीण अभियंता रानभरे यांच्याकडे अहवाल पाठवून कार्यवाही प्रस्तावित केली. त्यानुसार मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.