अतिक्रमणविरोधी मोहिमेला तूर्त स्थगिती
By admin | Published: May 28, 2014 12:53 AM2014-05-28T00:53:19+5:302014-05-28T00:53:33+5:30
हायकोर्टाचा आदेश : महापालिकेने कारवाई थांबविली
कोल्हापूर : गांधीनगर रस्त्यावरील महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी अतिक्रमण हटविण्याची मोहीम आज, मंगळवारी उच्च न्यायालयाच्या ‘जैसे थे’ ठेवण्याच्या आदेशाने तूर्त स्थगित करण्यात आली. वादग्रस्त व बहुचर्चित ठरलेल्या या अतिक्रमण मोहिमेचा फैसला १६ जून रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान, दोन दिवसांत महापालिकेने २७ हून अधिक इमारती जमीनदोस्त केल्या. तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील महापालिकेच्या ट्रक टर्मिनस, कचरा डेपो व ना विकास क्षेत्र, या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. गेले अनेक दिवस बांधकामे पाडण्याची रेंगाळलेली मोहीम महापालिकेने अखेर काल, सोमवारपासून हाती घेतली. काल दिवसभरात ११ इमारतींच्या दर्शनी बाजू व संरक्षक भिंती पाडून २४ मीटर रस्त्याची आखणी केली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज पुन्हा अधिक जोमाने कारवाई सुरू केली. दरम्यान, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. एच. सोनक यांनी व्यापार्यांची अतिक्रमण कारवाई थांबविण्याची याचिका दाखल करून घेतली. महापालिकेने १६ जूनपर्यंत कारवाईबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याची सूचना केली. यामुळे दुपारी दोननंतर महापालिकेने कारवाई तूर्त थांबवली.