फुटबॉल हंगामाला स्थगिती-प्रामाणिक फुटबॉलप्रेमींमध्ये निराशा-पोलीस आक्रमक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:51 AM2019-03-26T00:51:16+5:302019-03-26T00:52:05+5:30

फुटबॉल सामन्यानंतर शाहू स्टेडियमबाहेर रविवारी सायंकाळी घडलेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर येथून पुढे कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम स्थगित ठेवण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.

The suspension of the football season-frustration among the honest football fans-the police will be aggressive | फुटबॉल हंगामाला स्थगिती-प्रामाणिक फुटबॉलप्रेमींमध्ये निराशा-पोलीस आक्रमक होणार

फुटबॉल हंगामाला स्थगिती-प्रामाणिक फुटबॉलप्रेमींमध्ये निराशा-पोलीस आक्रमक होणार

Next
ठळक मुद्देकेएसएचा निर्णय : हुल्लडबाजीचे पडसाद

कोल्हापूर : फुटबॉल सामन्यानंतर शाहू स्टेडियमबाहेर रविवारी सायंकाळी घडलेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर येथून पुढे कोल्हापूरचाफुटबॉल हंगाम स्थगित ठेवण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक शाहू स्टेडियमवर झाली.

बालगोपाल तालीम मंडळाच्यावतीने गेली तीन आठवडे शाहू स्टेडियमवर चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू होत्या. रविवारी पाटाकडील तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात अंतिम सामना चुरशीचा झाला. मैदानावर खेळाडंूत चुरस दिसून आली. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या समर्थकांत इर्ष्या निर्माण झाली होती. या इर्ष्येचे रूपांतर अर्वाच्च शिवीगाळीमध्ये होऊ लागल्याने मैदानातून क्रीडाशौकिनांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या; पण प्रेक्षक गॅलरीतून अश्लील हावभाव, शिवीगाळ होऊ लागली. सामना संपल्यानंतर हुल्लडबाज प्रेक्षकांनी मैदानाबाहेरून दगडफेक व वाहने तोडफोडीच्या घटना केल्या. याबाबतचे प्रकरण कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आणि पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतले.

सोमवारी सायंकाळी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए)च्या पदाधिकाऱ्यांची बैठक अध्यक्ष मालोजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयात झाली. त्यामध्ये सखोल चर्चा करण्यात आली. झालेला सर्व प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या प्रकाराची नोंद घेऊन ‘केएसए’ने सद्य:परिस्थितीत स्थानिक सर्व फुटबॉल स्पर्धा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस, माजी अध्यक्ष सरदार मोमीन, सचिव माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, संभाजीराव मांगुरे-पाटील, विश्वास कांबळे, संजय पोरे, प्रकाश राऊत, अमर सासने आदी सदस्य उपस्थित होते.


जूनअखेर फुटबॉलचा हंगाम
कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या लिगद्वारे नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झाला. वरिष्ठ गटात १७ संघांद्वारे ६४ सामने खेळविण्यात आले. सुमारे दीड महिने लिग स्पर्धा पार पडली. त्यानंतर राजेश चषक, अस्मिता चषक, अटल चषक आणि चंद्रकांत चषक ही स्पर्धा यंदा पार पडली. आता महासंग्राम आणि सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचे नियोजन होते. कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम जूनअखेरपर्यंत अखंडपणे सुरू असतो.


हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलीस आक्रमक होणार
कोल्हापूर : फुटबॉल सामन्यावेळी मैदानावर अगर मैदानाबाहेर होणारी हुल्लडबाजी रोखण्यासाठी आणखी कडक धोरण अवलंबिण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी येथून पुढे स्पर्धा संयोजकांसह, फुटबॉल संघ, केएसए यांनाही या निर्णयात बांधील करण्यात येणार आहे. दरम्यान, चंद्रकांत चषक फुटबॉल सामन्यावेळी संपूर्ण शाहू स्टेडियमवरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्याने रविवारी सायंकाळी हुल्लडबाजी केलेल्यांवर कारवाई करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. रविवारच्या घटनेबद्दल ज्येष्ठ फुटबॉल खेळाडूंसह क्रीडाशौकिनांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अशा हुल्लडबाजांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

रविवारी सायंकाळी शाहू स्टेडियमवर चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना दिलबहार तालीम आणि पाटाकडील तालीम यांच्यात झाला. सामन्यानंतर काही हुल्लडबाजांनी मैदानाबाहेर जाऊन रस्त्यावरील विद्युत पुरवठा खंडित करून क्रीडाशौकिनांच्या पार्किंग केलेल्या वाहनांवर दगडफेक करून त्यांची मोडतोड केली. काहीजणांवर हल्ला केला. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले.

वारंवार होणाऱ्या या घटनांना पायबंद घालण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. रविवारचे प्रकरण पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेऊन येथून पुढे मैदानात अगर मैदानाबाहेर कोणताही प्रकार घडल्यास त्याला स्पर्धा संयोजकांना जबाबदार धरण्यात येणार आहे तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास सर्व स्पर्धा थांबविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या बंधनांचे पालन केल्याखेरीज कोणत्याही स्पर्धेस परवानगी दिली जाणार नाही.

दरम्यान, पोलीस तोडफोडीच्या घटनेनंतर रविवारी आणि सोमवारी पोलिसांनी हुल्लडबाजांचा शोध घेण्यासाठी शाहू स्टेडियमवरील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न केला, पण दुदैवाने हे सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक माहिती पोलीस प्रशासनास मिळाली. स्पर्धा संयोजकांकडून या सीसीटीव्हीचे पैसे भरून घेतले जात असताना हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे, असाही प्रश्न समोर आला आहे.

पोलिसांची नियमावली
प्रत्येक स्पर्धेतील प्रत्येक सामन्यावेळी किमान २५ ते ५० पोलिसांच्यासाठी पैसे भरणे आवश्यक.
मैदानात उतरण्यास प्रेक्षकांना प्रतिबंध, प्रेक्षक गॅलरीत स्वतंत्र ग्रील उभारणे आवश्यक
मैदानात फुकट्यांना प्रवेश प्रतिबंध करावासामन्यावेळी मैदानात प्रवेश करताना प्रत्येकाची तपासणी आवश्यक


 

फुटबॉल स्पर्धेतील तोडफोड दुर्दैवी : मालोजीराजे

कोल्हापूरचा फुटबॉलचे कौतुक देशपातळीवर केले जात असताना हुल्लडबाज, तोडफोडीच्या घटनांमुळे त्याला काळीमा फासला जात आहे. फुटबॉल खेळासंबंधीत सर्वच घटकांनी या घटकांनी त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक खेळाडू, प्रेक्षक, पंच, समर्थकांनी आपली लक्ष्मणरेषा लक्षात ठेवली पाहिजे. कोल्हापूरच्या फुटबॉलचे नाव देशपातळीपर्यंत कौतुकाने घेतले जात असताना अशा घटनांनी देशभर आपण काय संदेश देत आहोत याचेही आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी सर्वच घटकांनी आज खिलाडूवृत्ती जोपासण्याची आवश्यकता आहे. जय-पराजय पचविण्याची क्षमता प्रत्येक संघात असली पाहिजे. अर्वाच्च शिवीगाळ, हुल्लडबाजी, तोडफोड, मैदानावर वस्तू फेकून मारणे आदी घटना ह्या कोल्हापूरच्या फुटबॉलवाढीस घातक असल्याचे मत कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे यांनी व्यक्त केले.

स्पर्धेतील इर्ष्या ही आज फुटबॉल मोठा होण्यापेक्षा अधोगतीला नेणारी ठरत आहे. यासाठी सर्वच घटक जबाबदार आहेत. १० ते २२ वयोगटांतील अनेक तरुण आज सामन्यावेळी विनातिकीट प्रवेश करून हुल्लडबाजी करण्यात पुढे असतात त्यांना त्या-त्या तालीम संस्था अगर स्पर्धा संयोजकांनी रोखले पाहिजे, पोलिसांच्या कारवाईत कोणताही हस्तक्षेप करु नये.
- राजू घारगे, ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू

हुल्लडबाजी करणारे अगर त्यांना चिथावणी देणारे अवघे १० टक्के प्रेक्षक आहेत, त्यांच्यावर त्या-त्या तालीम संस्थांच्या प्रमुखांचे लक्ष असणे आवश्यक आहे. हे पाळले तरच कोल्हापूरचा फुटबॉल उंचावर पोहोचेल.
- शिवाजी पाटील, ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू

हुल्लडबाजांकडून होणारे वातावरण कोल्हापूरच्या फुटबॉल वाढीला घातक आहे. इर्ष्या असावी पण ती खेळात असावी; हाणामारीत नको. मैदानात खेळाडूंनी विजयाचा अगर गोल नोंदविल्याचा जल्लोष करावा पण तो विरोधकांना चिथावणी देणारा नसावा तसेच पराभव पचविण्याची ताकद नसणाऱ्यांनी स्पर्धेत सहभागी होऊ नये.
- मनोज जाधव,
ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू

चुकणारे प्रेक्षक असो, खेळाडू अगर पंच यांच्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी स्पर्धा संयोजन समिती अथवा कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनवर सक्षम सदस्य असावेत. त्यांनी कोणालाही पाठीशी न घालता ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.
- उदय पाटील, ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू

हुल्लडबाजीमुळे आज फुटबॉल बंद पडण्याच्या स्थितीत येऊन ठेपला आहे. हुल्लडबाज प्रेक्षकांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी तालीम संस्थांनी पुढाकार घ्यावा.
- शरद पवार, ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू

हुल्लडबाजीची घटना गंभीर आहेत; पण त्यांना चिथावणी देणारेही तितकेच जबाबदार आहेत. यापूर्वीच्या स्पर्धेतील सीसी कॅमेरातील चित्रीकरणाची तपासणी करून हुल्लडबाजांना टिपावे. त्यांना मैदानात प्रवेश देण्यास प्रतिबंध करावा.- किरण साळोखे, ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू

Web Title: The suspension of the football season-frustration among the honest football fans-the police will be aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.