भरतीला स्थगिती; अंगणवाडीतील २० हजार जागा रिक्तच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 07:47 AM2023-03-28T07:47:01+5:302023-03-28T07:47:10+5:30
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सोमवारी दुपारी स्थगितीचे आदेश काढले.
- समीर देशपांडे
कोल्हापूर : राज्यातील २०,६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे १७ एप्रिल २०२३पर्यंत ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सोमवारी दुपारी स्थगितीचे आदेश काढले.
७ फेब्रुवारी २०२३च्या पत्रानुसार नोव्हेंबर २०२२च्या अहवालानुसार रिक्त असलेल्या ४,५०९ अंगणवाडी सेविका, ६२६ मिनी अंगणवाडी सेविका आणि १५ हजार ४६६ मदतनीस अशा २० हजार ६०१ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ३१ मे २०२३ पर्यंत भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाहिराती देऊन अर्जही स्वीकारण्यास सुरुवात केली.
परंतु, अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सुधारित शैक्षणिक पात्रताबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याची सुनावणी अलीकडेच होऊन न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत या भरतीला स्थगिती दिली. दरम्यान अंगणवाडी भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रकि्या सुरु असतानाच सुधारित शैक्षणिक पात्रतेमुळे भरतीला स्थगिती दिल्याने हजारो उमेदवार हवालदिल झाले आहेत.