चारित्र्याचा संशय; पत्नीचा खून उदगाव येथील घटना; मुलासमोरच कुऱ्हाडीचे घाव--मृत भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:22 AM2018-06-24T01:22:17+5:302018-06-24T01:25:32+5:30

उदगाव (ता.शिरोळ) येथे चारित्र्याच्या संशयावरून कुºहाडीचे आठ घाव घालून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली.

Suspicion of character; Wife murdered in Uganda; Kurhadi wounds in front of child - the deceased Bhumata brigade's district vice president | चारित्र्याचा संशय; पत्नीचा खून उदगाव येथील घटना; मुलासमोरच कुऱ्हाडीचे घाव--मृत भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष

चारित्र्याचा संशय; पत्नीचा खून उदगाव येथील घटना; मुलासमोरच कुऱ्हाडीचे घाव--मृत भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष

Next

उदगाव : उदगाव (ता.शिरोळ) येथे चारित्र्याच्या संशयावरून कुºहाडीचे आठ घाव घालून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. माधुरी सूर्यकांत शिंदे (वय ३८, रा. उदगाव) असे मृत महिलेचे नाव असून, त्या भूमाता ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष होत्या. खुनाच्या घटनेनंतर पती सूर्यकांत महादेव शिंदे (४३, रा. उदगाव) हा स्वत:हून जयसिंगपूर पोलिसांत हजर झाला आहे. त्याच्यावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. या घटनेवेळी माधुरी यांचा प्रियकर संतोष श्रीकृष्ण माने-घालवाडे (२७, रा. उदगाव) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उदगाव-चिंचवाड मार्गावरील कृष्णामाई सोसायटीलगत सूर्यकांत शिंदे यांचे घर आहे. गेल्या सात वर्षांपासून सूर्यकांत व माधुरी यांच्यामध्ये घरगुती वाद सुरू होता. त्यामुळे माधुरी या मुलगा शिवराज (८) व मुलगी रेवती (१७) यांच्यासह गेल्या तीन वर्षांपासून विभक्त राहतात. तर पती सूर्यकांत हा आपल्या आई-वडिलांसोबत राहात होता. घराची वाटणी व घटस्फोटासाठी न्यायालयात वाद सुरू होता. त्यातच माधुरी हिच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून वारंवार पती-पत्नीत वाद होत होते.

दरम्यान, शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पती सूर्यकांत याने माधुरी यांच्या घरात संतोष माने याला पाहिले. त्यानंतर संतोष व सूर्यकांत यांच्यात बाचाबाची होऊन झटापट झाली. माधुरी यांचे संतोष याच्याबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सूर्यकांतने माधुरीवर कुºहाडीने सपासप आठ वर्मी घाव घालून खून केला. माधुरी यांच्या गळ्यावर तीन, डोक्यावर दोन, डाव्या हातावर एक, पाठीवर दोन असे आठ ठिकाणी कुºहाडीने घाव घातल्यामुळे त्या घरामागे असलेल्या रिकाम्या जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. घटनास्थळीच माधुरीचा मृत्यू झाला होता.

घटनेनंतर संशयित आरोपी सूर्यकांत हा मुलगा शिवराज याला सोबत घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस पंचनाम्यामध्ये खुनात वापरण्यात आलेली कुºहाड मृतदेहाजवळच आढळली. तसेच माधुरी यांचा प्रियकर संतोष मानेही तेथे हजर होता. त्यालाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकारांना दिली. सुर्यकांत पोलिसांत हजर झाल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. माधुरीचे संतोष माने-घालवाडे याच्याशी अनैतिक संबंध होते.

मी वारंवार दोघांना सांगूनही त्यांनी माझे ऐकले नाही. शनिवारी सकाळी पत्नीसोबत संतोष माने दिसल्याने माझा राग अनावर झाला, त्यातूनच हे कृत्य घडल्याची कबुली सूर्यकांत याने दिल्याची माहिती पिंगळे यांनी दिली. घटनास्थळी जयसिंगपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे, विक्रम चव्हाण, सुरेश कोळी, एल. एस. राऊत यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
संशयित पोलिसांत हजर
दरम्यान खुनाच्या घटनेनंतर संशयित आरोपी सूर्यकांत शिंदे मुलासह पोलिसांत हजर झाला.
यापूर्वीही खुनाचा प्रयत्न वर्षभरापूर्वी पती सूर्यकांत याने अनैतिक संशयाच्या कारणावरूनच माधुरी हिच्या डोक्यात लोखंडी पारीने घाव घालून तिला जखमी केले होते. त्या सांगली येथील खासगी रुग्णालयात सुमारे २५ दिवस होत्या.

मुलासमोरच खून
अनैतिक संबंधाच्या संशयातून सूर्यकांतने पत्नी माधुरीवर कुºहाडीने सपासप वार केले. हा वार करत असताना त्यांचा आठ वर्षांचा मुलगा शिवराज समोरच उभा होता. आईवर वडील कुºहाडीने वार करत असताना शिवराज हा घाबरून रडत होता. त्यामुळे या घटनेचा साक्षीदार तो ठरला आहे.

प्रेमविवाहाचा अखेर अंत
सूर्यकांत व माधुरी यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना मुलगा व मुलगी झाल्यानंतर दोघांतील वादामुळे ते विभक्त राहत होते. माधुरी यांच्याबरोबर पती, सासू, सासरे व नणंद यांच्याबरोबर वारंवार कौटुंबिक वाद याबरोबरच न्यायालयीन वादही सुरू होता. अखेर शनिवारी पत्नीचा खून करून पतीने आपल्या प्रेमविवाहाचा अंत केला. माधुरी यांचे माहेर सांगली आहे.

प्रमोद पाटीलसह दोघांना अटक
जयसिंगपूर : संतोष माने व प्रमोद पाटील यांनी आपल्याला संगनमताने ठार मारण्याचे कारस्थान रचल्याबाबतची फिर्याद संशयित आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे (वय ४३, रा. उदगाव) याने जयसिंगपूर पोलिसांत दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी छत्रपती गु्रपचे अध्यक्ष प्रमोद पाटील (रा. राजापूर, ता. शिरोळ) व संतोष श्रीकृष्ण माने (रा. उदगाव, ता. शिरोळ) या दोघांना शनिवारी रात्री अटक केली. सूर्यकांत शिंदे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पत्नी व संतोष माने याला घरात एकत्र पाहिले. यानंतर आपण माधुरीला हाक मारली. तसेच संतोषला बाहेर येण्यास सांगितले. यावेळी स्वयंपाकखोलीतून बाहेर येऊन संतोष अंगावर धावून आला. आपणास मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी देत ‘तू नेहमीच माझ्या, प्रमोददादाच्या व माधुरीच्या संबंधांमध्ये येतोस. कालच प्रमोद दादाने तुला कायमचे संपविण्यासाठी सांगितले आहे,’ असे म्हणत संतोषने घरातील कुऱ्हाड घेऊन आपल्या मानेवर जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. त्यावेळी आपण त्यास ढकलून तो वार चुकविला. मात्र, तो वार आपल्या डाव्या हातावर लागून आपण जखमी झालो. तेथून घाबरून जीव वाचविण्याकरिता पळून जाऊन खोलीत लपून बसलो. त्यानंतर संतोषने ‘बाहेर ये, तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.सूर्यकांत शिंदे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आपसात संगनमत करून सूर्यकांतला संपविण्याचा कट रचल्याप्रकरणी प्रमोद पाटील व संतोष माने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा दोघांनाही अटक करण्यात आली असल्याचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.

 

Web Title: Suspicion of character; Wife murdered in Uganda; Kurhadi wounds in front of child - the deceased Bhumata brigade's district vice president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.