संकेश्वर येथे महिलेचा गोळ्या घालून खून, मालमत्तेच्या वादातून खून झाल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 11:52 AM2022-01-17T11:52:45+5:302022-01-17T11:53:32+5:30
भर मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे संकेश्वरसह जिल्ह्यात खळबळ उडाली
संकेश्वर : मालमत्तेचा वाद किंवा आर्थिक व्यवहारातून येथील महिलेची गावठी कट्ट्याने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शैलजा ऊर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार (वय ५५, रा.सुभाष रोड, कमतनूर वेस, संकेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे. सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, शैलजा या येथील सुभाष रोडवरील आपल्या दुमजली घरातील माडीवर एकट्या राहत होत्या. तळमजल्यावरील दुकानगाळे त्यांनी भाड्याने दिले आहेत. दुकानात मुक्कामाला राहणाऱ्या एका व्यापाऱ्याने बराच वेळ हाक मारूनही त्या बाहेर न आल्यामुळे त्यांनी पोलिसांना कळविले.
पोलीस आल्यानंतर घराचा दरवाजा उघडून पाहिले असता, हॉलमध्ये त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्यांच्या छातीत व डोक्याला गोळी लागल्याचे पोलिसांनी सांगितले. बेळगावहून आलेल्या श्वान पथकाने परिसर पिंजून काढला, तसेच परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेजही घेतले.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महालिंग नंदगावी, डीएसपी मनोजकुमार नायक, पोलीस निरीक्षक गणपती कोगनोळी यांनी भेट दिली. भर मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे संकेश्वरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संकेश्वर पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यानंतर, बेळगांव येथे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर संकेश्वरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
आर्थिक व्यवहारातून हत्या?
शैलजा यांचे माहेर व सासर संकेश्वर येथेच आहे. निरंजन सुभेदार यांच्याशी त्यांचा २० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दरम्यान, १० वर्षांपूर्वी निरंजन यांचे निधन झाले आहे. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांची संकेश्वर व बडकुंद्री (ता.हुक्केरी) येथे स्थावर मालमत्ता आहे. त्यामुळे मालमत्तेचा वाद किंवा आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
श्वान घराजवळच घुटमळला
तपासासाठी बेळगावहून आणलेल्या श्वानाला घटनास्थळावरून फिरविले असता. मड्डी गल्ली, यल्लम्मा देवी, संसुद्धी गल्ली या ठिकाणी घुटमळून तो पुन्हा घराजवळ येऊन थांबला.