‘बहुजन परिवर्तन’कडून हिंसक आंदोलनाचा संशय
By admin | Published: February 5, 2015 12:28 AM2015-02-05T00:28:07+5:302015-02-05T00:29:05+5:30
पोलीस प्रशासनास पत्र : जिल्हा प्रशासन सतर्क; आंदोलनस्थळी बंदोबस्तात वाढ
कोल्हापूर : येथील लक्षतीर्थ वसाहत व सायबर येथील डवरी वसाहतीतील राखीव जागा अतिक्रमण काढून ताब्यात द्यावी, यासाठी बहुजन परिवर्तन पार्टीप्रणीत महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे. मागण्यांसंबंधी चर्चा करण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार आहे; परंतु आंदोलकांचा प्रतिसाद नाही. याउलट चर्चेकडे दुर्लक्ष करून आंदोलन हिंसक करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा संशय जिल्हा प्रशासनाला आला आहे, तशी माहिती पोलीस प्रशासनासही देण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी बुधवारी बंदोबस्त वाढविण्यात आला.
सायबर कॉलेज येथील यशवंत गृहनिर्माण संस्थेच्या कथित वादग्रस्त जागेवर अतिक्रमण झाले आहे. लक्षतीर्थ वसाहतीत मागासलेल्या मुला-मुलींच्या वसतिगृहांसाठी दिलेल्या जागेवर अतिक्रमण झाल्याने डवरी समाज मुलांबाळांना घेऊन उपोषणास बसला आहे. जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही, तर आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन आंदोलकांशी चर्चेसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, आंदोलकांनी, चर्चेसाठी आम्ही येणार नाही, अधिकाऱ्यांनीच आंदोलनस्थळी यावे असा आग्रह धरला आहे. कितीही तीव्र आंदोलन केले तरी चर्चेतूनच मार्ग काढावा लागणार आह, असे असताना आडमुठेपणाने चर्चेसाठी आम्ही येणारच नाही, जागा ताब्यात द्या, अशा भूमिकेवर ठाम राहणे कितपत योग्य, अशी विचारणा प्रशासाकडून होत आहे. हिंसक वळण लावण्याचा डाव असल्याचा संशय जिल्हा प्रशासनाला आला आहे.
वादग्रस्त जागेवर सहा कुटुंबांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत, असा आरोप आहे. जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. परिणामी यातून मार्ग काढण्यासंबंधी प्रशासनाचीही कोंडी झाली आहे. जागा ताब्यात घेऊन अतिक्रमण केलेल्यांवर फौजदारी करावी, अशीही मागणी असल्याने जिल्हा प्रशासनावर मर्यादा येत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून ही जागा रिकामी करुन देतो अशी कांहीजणांनी संस्थेकडून सुपारीच घेतली असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.