नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

By admin | Published: September 13, 2015 12:43 AM2015-09-13T00:43:36+5:302015-09-13T00:43:36+5:30

माहेरच्यांचा पोलीस ठाण्यात गोंधळ : पतीसह चौघे ताब्यात

Suspicious death of newlyweds | नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

Next

कोल्हापूर : येथील संभाजीनगर परिसरात गजानन महाराज नगरमध्ये शनिवारी सायंकाळी नवविवाहिता स्वानंदी सुनील क्षीरसागर (वय २४) हिचा भाजून संशयास्पद मृत्यू झाला. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातला. याबाबत माहिती अशी की, स्वानंदी सुनील क्षीरसागर हिचे माहेर रविवार पेठेतील पूलगल्ली तालमीशेजारी आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी स्वानंदी क्षीरसागर (माहेरचे नाव प्रज्ञा यादव) हिचा विवाह गजानन महाराज नगरातील सुनील क्षीरसागर याच्यासोबत झाला होता. सुनील क्षीरसागर हा रुकडीकर महाराज ट्रस्ट येथे लिपिक म्हणून नोकरीस आहे.
शनिवारी दुपारी स्वानंदीच्या पतीसह घरातील सर्वजण घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यानंतर सायंकाळी ते सर्व घरी परतले. त्यानंतर सुनील क्षीरसागर याने स्वानंदीच्या माहेरी तिच्या भावाला घरी मोबाईलवर फोन करून सर्वांना इकडे येण्याबाबत सांगितले. त्यावेळी काहीतरी विपरीत घडल्याच्या शंकेने माहेरच्या लोकांनी स्वानंदीच्या गजानन महाराज नगरातील घरी धाव घेतली. त्यावेळी घरात तळमजल्यावर स्वानंदीचे पती सुनील क्षीरसागर तसेच सासू, सासरे, दीर व भावजय असे बसले होते. त्यानंतर स्वानंदीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत नातेवाइकांना पहिल्या मजल्यावरील स्नानगृहात पडल्याचा आढळून आला. घटनास्थळाचे हे दृश्य पाहून सारे हादरलेच. त्यानंतर स्वानंदीच्या माहेरकडील नातेवाइकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
यावेळी नातेवाइकांनी सुनील क्षीरसागर याच्यासह सर्वांना शिवीगाळ करत तेथे गोंधळ घातला. तसेच नातेवाइकांनीच याची कल्पना जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ‘सीपीआर’मध्ये शवविच्छेदनासाठी नेला. दरम्यान, क्षीरसागर कुटुंबीयांनीच स्वानंदीला पेटवून ठार मारल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी करीत जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातला. संशयितांवर कारवाईची मागणी केली. जमावाचा प्रक्षोभ पाहून पोलिसांनी स्वानंदीच्या पतीसह सासरे, सासू आदींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)

Web Title: Suspicious death of newlyweds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.