कोल्हापुरातील वडणगेत दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, आयुर्वेदिक औषध सेवनानंतर रिॲक्शन आल्याचा कुटुंबीयांचा दावा

By उद्धव गोडसे | Published: May 31, 2023 01:36 PM2023-05-31T13:36:31+5:302023-05-31T13:36:58+5:30

पती-पत्नीच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात उडाली खळबळ

Suspicious death of couple in Vadange Kolhapur, family claims reaction after taking Ayurvedic medicine | कोल्हापुरातील वडणगेत दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, आयुर्वेदिक औषध सेवनानंतर रिॲक्शन आल्याचा कुटुंबीयांचा दावा

कोल्हापुरातील वडणगेत दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, आयुर्वेदिक औषध सेवनानंतर रिॲक्शन आल्याचा कुटुंबीयांचा दावा

googlenewsNext

कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील मधुकर दिनकर कदम (वय ५९) आणि जयश्री मधुकर कदम (४९, दोघे रा. दिंडे कॉलनी, वडणगे) यांचा बुधवारी (दि. ३१) सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिॲक्शन आल्याने दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज कदम दाम्पत्याच्या मुलींनी वर्तवला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी दोघांचा व्हिसेरा राखीव ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे शिवाजी पेठेतील मधुकर कदम हे त्यांची पत्नी आणि दोन मुलींसह वर्षभरापूर्वीच वडणगे येथील नवीन घरात राहायला गेले होते. एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले कदम यांना मधुमेहाचा त्रास सुरू होता. त्यांची पत्नी जयश्री यांनाही काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास सुरू होता.

दोघांनी १५ दिवसांपूर्वीच मुक्त सैनिक वसाहत परिसरातील एका डॉक्टरकडून आयुर्वेदिक औषध घेतले होते. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोघांनीही औषधी पावडर पाण्यात मिसळून प्राशन केली. त्यानंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले, तर जयश्री या स्वयंपाक करत होत्या. काही वेळातच जयश्री यांना अस्वस्थ वाटू लागले. श्वासोच्छवासास त्रास होऊ लागला. सुमारे २० मिनिटांनी त्या बेशुद्ध पडल्या.

दरम्यान, दूध आणण्यासाठी गेलेलेे मधुकर कदमही दूध डेअरीजवळच्या चौकात चक्कार येऊन पडल्याचे नागरिकांना आढळले. परिसरातील नागरिकांनी तातडीने कदम दाम्पत्यास शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, बाहेरच तपासणी करून त्यांनी रुग्णांना सीपीआरमध्ये पाठवले. सीपीआरमधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कदम दाम्पत्याच्या दोन्ही मुलींना धक्का बसला. पती-पत्नीच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत दाम्पत्याच्या पश्चात गायत्री (वय १९) आणि विजया (१७) दोन मुली आहेत. 

व्हिसेरा राखीव

कदम दाम्पत्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी सीपीआरमधील डॉक्टरांनी व्हिसेरा राखीव ठेवला आहे. शवचिकित्सा आणि व्हिसेराचा अहवाल येताच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

Web Title: Suspicious death of couple in Vadange Kolhapur, family claims reaction after taking Ayurvedic medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.