Kolhapur News: गडहिंग्लज येथील हमालाचा संशयास्पद मृत्यू!, पोलिसांकडून तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 12:02 PM2023-03-09T12:02:28+5:302023-03-09T12:29:23+5:30
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू
राम मगदूम
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील हमालाचा काल, बुधवारी (८) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष शंकर पोवार (वय ५०, मूळगाव गिजवणे, सध्या रा. लक्ष्मी मंदिराजवळ, गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. त्याच्या संशयास्पद मृत्यूने लक्ष्मीरोडवरील भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांतून हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मूळचा गिजवणे येथील रहिवासी असणारा संतोष हा शहरातील लक्ष्मीरोडवर हमाली करत होता. पडेल ते काम करत, मिळेल ते खाऊन त्याच परिसरात राहत होता. त्याला दारूचे व्यसनही होते.
मंगळवारी (७) रात्री येथील लक्ष्मी रोडवरील हिडदुगी यांच्या दुकानानजीक वीजेच्या डी.पी.जवळ संतोष आणि दोघांची वादावादी झाली. धक्काबुक्की व मारहाणीत तो खाली कोसळला. त्यानंतर उठून तो नेहमीच्या जागी झोपी गेला.
दरम्यान, बुधवारी (८) सकाळी उशिरापर्यंत न उठल्यामुळे आजूबाजूच्या भाजी विक्रेत्यांनी त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्धावस्थेत होता. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला.
व्यसनाधीनतेमुळे 'संतोष'शी पटत नसल्यामुळे त्याची पत्नी माहेरीच राहते असे समजते. त्याच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
'सीसीटीव्ही फुटेज'वरून तपास !
गुरुवारी (९) सकाळी पोलीस उपनिरीक्षक शितल सिसाळ व समाधान घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आणि भाजी विक्रेते यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून 'संतोष'ची कुणासोबत वादावादी झाली?त्याला मारहाण करणारे कोण? याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.