Kolhapur: निवृत्त रेल्वे पोलिसाचा पत्नीसह संशयास्पद मृत्यू, घातपाताची चर्चा; गडहिंग्लज तालुक्यात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2023 04:56 PM2023-08-04T16:56:50+5:302023-08-04T16:57:09+5:30
तपासणीत दोघांच्याही शरीरात इन्फेक्शन आढळून आले
नेसरी : वाघराळी (ता. गडहिंग्लज) येथील केंद्रीय रेल्वे पोलिस दलाचे सेवानिवृत्त कर्मचारी सिद्धू तुकाराम सुतार (वय ७०) आणि त्यांच्या पत्नी बायाक्का (६५) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्रीची ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या वयोवृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून, या घटनेमुळे नेसरी पंचक्रोशीसह गडहिंग्लज विभागात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सिद्धू हे केंद्रीय रेल्वे पोलिसांतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना मुलगा व दोन मुली आहेत. दोन्ही मुलींचा विवाह झाला आहे. मुलगा अविवाहित असून नोकरीनिमित्त तो मुंबईत राहतो. त्यामुळे गावातील सावंत गल्लीतील कौलारू घरात ते दोघेच राहत होते.
बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे एकत्र जेवणानंतर ते झोपी गेले. गुरुवारी सकाळी शेजारील महिलेला सुतार यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. तिने घरात डोकावून पाहिले असता सिद्ध हे कॉटवर, तर बायाक्का या स्वयंपाकघरात मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांनी याबाबत पोलिस पाटलांना कळवले.
नेसरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घरातील काही वस्तूही अस्ताव्यस्त पडल्या होत्या. बायाक्कांच्या हातातील बांगड्या फुटलेल्या आणि मोडलेली प्लास्टिकची खुर्ची निदर्शनास आली.
दीपक धोंडिबा लोहार (३६) यांच्या वर्दीवरून नेसरी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. पोलिस उपअधीक्षक राजीव नवले, स.पो.नि. संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घातपाताची चर्चा!
बुधवारी सुतार यांनी बँकेतून पैसे काढले होते. त्यामुळे अज्ञातांनी चोरीच्या उद्देशाने पाळत ठेवून त्यांचा घात केल्याची आणि बायाक्कांच्या गळ्यातील गंठण, कर्णफुले लांबवल्याची चर्चा घटनास्थळी होती; परंतु, पोलिसांनी त्याचा इन्कार केला.
वाघराळीकरांना धक्का!
सिद्धू व बायाक्का दोघेही साधे व सरळ स्वभावाचे होते. त्यांचे गावात कुणाशीही वैर नव्हते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने वाघराळी ग्रामस्थांना धक्का बसला आहे.
शरीरात इन्फेक्शन !
सिद्धू व बायक्का या दोघांच्या अंगावर कोणत्याही जखमा किंवा व्रण नव्हते. घरातील सर्व वस्तू जिथल्या तिथे होत्या. त्यामुळे घातपाताची शक्यता वाटत नाही; परंतु, उत्तरीय तपासणीत दोघांच्याही शरीरात इन्फेक्शन आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असून त्यांचा व्हिसेराही राखून ठेवला आहे. त्याचा अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे स.पो.नि. कांबळे यांनी सांगितले.