साठेबाजाराबाबत संशयाची सुई राजू शेट्टींकडेच

By admin | Published: January 18, 2016 12:57 AM2016-01-18T00:57:00+5:302016-01-18T00:57:18+5:30

हसन मुश्रीफ यांचा प्रत्यारोप : शेट्टी म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’

Suspicious needle of Sathebazar Raju Shetty | साठेबाजाराबाबत संशयाची सुई राजू शेट्टींकडेच

साठेबाजाराबाबत संशयाची सुई राजू शेट्टींकडेच

Next

कोल्हापूर : साखरेचे दर वाढत असताना वायदेबाजाराच्या चौकशीची मागणी करून व्यापाऱ्यांना घाबरवून दर पाडण्याचा प्रयत्न खासदार राजू शेट्टी यांनी केल्याने साठेबाजाराबाबत निर्माण झालेली संशयाची सुई त्यांच्याकडे झुकत असल्याचा प्रत्यारोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. चौकशीचा घाव मुश्रीफांच्या वर्मी बसला नसून शेट्टी यांना सत्य काय आहे, हे समजल्यामुळेच त्यांचा त्रागा सुरू आहे. शेट्टी म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ असल्याची टीकाही त्यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली.
वायदेबाजारातील साखरविक्रीच्या चौकशीची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केल्याने आमदार हसन मुश्रीफ व त्यांच्यामध्ये गेले चार दिवस वार-पलटवार सुरू आहेत. आमदार मुश्रीफ म्हणाले, साखरेचे दर वाढल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. अशावेळी व्यापाऱ्यांवर धाडी टाकून वायदेबाजाराच्या चौकशीची मागणी करून व्यापाऱ्यांना भीती दाखविली जात आहे. त्यामुळे साखरेचे दर वाढण्यावर मर्यादा आल्या असून, शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. आपण एक साधे ऊस उत्पादक शेतकरी आहोत. तथाकथित शेतकरी नेता नाही.
आपले सटोडिया, साखर व्यापारी अगर खासगी कॉर्पोरेट साखर कारखानदार यांच्याशी संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. आपले एकच म्हणणे आहे, साखरेच्या मोठ्या व्यापाऱ्यांनी हजारो कोटी फ्युचर ट्रेडिंगमध्ये कमी दराने साखर विकली होती. आता साखरेचे दर वाढल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. ते नुकसान थांबवायचे असल्यास साखरेचे दर कमी करणे एवढाच मार्ग होता. त्यासाठी अशा व्यापाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींचा वापर करण्यात आला.
असे व्यापारी व शेतकऱ्यांचे कर्दनकाळ जे नेते आहेत, त्यांचे संबंध काय आहेत? त्यांचे फोनवरून काय-काय बोलणे झाले, याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. कोणाची मिलीभगत आहे, हे सत्य शेतकऱ्यांसमोर आलेच पाहिजे, अशी मागणीही आमदार मुश्रीफ यांनी केली.
साखरेचे दर १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्याने एफआरपी देताना दमछाक झाली. त्यावेळी शेट्टी यांनी साठेबाजाराविरोधात तक्रारी का केल्या नाहीत? साखरेचे दर वाढत असतानाच तक्रारीचे कारण काय?
हे पाहिले तर वायदेबाजाराबाबत संशयाची सुई खासदार राजू
शेट्टी यांच्याकडेच जाते. नेहमीप्रमाणे दुसऱ्याचे नाव घेऊन त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये.
या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन ‘दूध का दूध, पानी का पानी’
झाले पाहिजे, अशी मागणी
आमदार मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली.

Web Title: Suspicious needle of Sathebazar Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.