संशयित कामगार ताब्यात

By admin | Published: April 26, 2015 01:15 AM2015-04-26T01:15:52+5:302015-04-26T01:15:52+5:30

अपहरण प्रकरण : मुलासह आपलेही अपहरण झाल्याचे सांगितले कथानक

Suspicious workers are in charge | संशयित कामगार ताब्यात

संशयित कामगार ताब्यात

Next

इचलकरंजी : महेश सेवा समिती येथून व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या अमोल आदिनाथ पडसलगे (वय २४, रा. कबनूर) याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. तो जखमी अवस्थेत असून, त्याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पडसलगे याने प्राथमिक चौकशीत अपहरणाबाबत फिल्मी कथानक सांगितले आहे. त्यामुळे नेमका प्रकार काय हे याबाबत पडसलगेला अटक करून चौकशी केल्यानंतरच उघडकीस येणार आहे.
शुक्रवारी महेश सेवा समिती येथील साखरपुडा समारंभातून ट्रेडिंग व्यापारी श्रीकांत बलदवा यांचा अडीच वर्षांचा मुलगा आरव याचे अपहरण झाले होते. त्याला सांभाळणारा कामगार अमोल पडसलगे हाही सकाळपासून बेपत्ता होता. त्यामुळे त्यानेच अपहरण केले असावे, अशी शक्यता व्यक्त होत होती. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास आयको मिलजवळील एका पडक्या घरात आरव बांधलेल्या अवस्थेत मिळून आला. मात्र, पडसलगे हा बेपत्ताच होता.
शनिवारी पहाटेच्या सुमारास पडसलगे घरी परत आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना समजली. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याने पोलिसांनी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. यावेळी प्राथमिक चौकशीत त्याने मुलासह आपलेही चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याचे कथानक सांगितले आहे. यामध्ये सहा हिंदी बोलणाऱ्या अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला बसमधून, त्यानंतर काळ्या व्हॅनमधून आपले अपहरण केल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या सांगण्यात व घटनाक्रमात तफावत असल्याने तो बनाव करीत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आज, रविवारी त्याला अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतरच या प्रकरणाचा नेमका उलगडा होईल, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पडसलगे आरव याला घेऊन जाताना महेश समितीजवळील सीसीटीव्हीत, तसेच आयको स्पिनिंग मिलकडे जाणाऱ्या मार्गावरील एका सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे स्वत:च्या बचावासाठी पडसलगे बनाव करीत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Suspicious workers are in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.