प्रश्न नाकारल्याबद्दल ‘सुटा’ आज जाब विचारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:34 AM2020-12-30T04:34:09+5:302020-12-30T04:34:09+5:30
कोल्हापूर : परिनियम आणि निकषाचे पालन करून आणि विहित मुदतीत अधिसभेसाठी (सिनेट) शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) सदस्यांनी विविध ...
कोल्हापूर : परिनियम आणि निकषाचे पालन करून आणि विहित मुदतीत अधिसभेसाठी (सिनेट) शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, कुलगुरूंनी पूर्णत: बेकायदेशीर आणि अयोग्य पध्दतीने हे प्रश्न नाकारले आहेत. त्याबाबत आज, बुधवारी होणाऱ्या अधिसभेमध्ये हे सदस्य जाब विचारणार आहेत. विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभागातील एका शिक्षकाची पदोन्नती नाकारणे, २०२०-२०२१ ची विद्यापीठाची डायरी तयार करण्याची जबाबदारी कोणावर होती? व्यवस्थापन, विद्यापरिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार कुलगुरूंनी केलेल्या कार्यवाहीत बदल, दुरूस्ती करण्याचा अधिकार किंवा कुलगुरूंची कार्यवाही रद्द करण्याचा अधिकार आहे काय?, कळे येथील महाविद्यालयास तत्कालीन नियमाप्रमाणे जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला म्हणून किती रुपये दंड आकारला होता? पदवी प्रमाणपत्राच्या दुबार छपाईच्या चौकशीचा अहवाल कुलपती कार्यालयाकडे पाठविण्याचे प्रयोजन काय?, आदी प्रश्न सुटाचे सदस्य प्रा. मनोज गुजर, इला जोगी, राजेंद्र थोरात, अरुण पाटील, एन. के. खंदारे, अशोककुमार पाटील, अलका निकम यांनी अधिसभेसाठी दिले होते; पण ते नाकारण्यात आले आहेत. त्याबाबतचा मुद्दा सुटाचे सदस्य उपस्थित करणार आहेत.
प्रतिक्रिया
आम्ही परिनियमांचे पालन करणारे प्रश्न अधिसभेसाठी विचारले होते; मात्र विद्यापीठ प्रशासनाने ते नाकारले आहेत. त्याबाबत आम्ही आज प्रशासनाला जाब विचारणार आहोत.
- इला जोगी, अधिसभा सदस्य