सुवर्णमहोत्सवी निधीचा प्रश्न लवकरच मार्गी!
By admin | Published: June 20, 2015 12:53 AM2015-06-20T00:53:32+5:302015-06-20T00:54:03+5:30
चंद्रकांतदादा पाटील : शिवाजी विद्यापीठातर्फे देवानंद शिंदे यांचा सत्कार
कोल्हापूर : राज्य शासनाने शिवाजी विद्यापीठासाठी घोषित केलेला ४५ कोटींच्या सुवर्णमहोत्सवी निधीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. यासाठी ३० जूनला वित्त व नियोजन मंत्र्यांसमवेत बैठक घेतली जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे सांगितले. विद्यापीठाचे नूतन कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांचे स्वागत आणि माजी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, माजी बीसीयुडी संचालकप्रा. आर. बी. पाटील यांच्याप्रती कृतज्ञता सोहळा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. यावेळी मंत्री पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते.ते म्हणाले, विद्यापीठाला अत्यंत वैभवशाली व पुरोगामी वारसा लाभला आहे. तो वारसा व वसा डोळ्यांसमोर ठेवून नूतन कुलगुरू डॉ. शिंदे आपली कारकीर्द यशस्वीरीत्या पूर्ण करतील, याची मला खात्री आहे. डॉ. शिंदे यांच्या रूपाने विद्यापीठाला नि:स्वार्थी, पारदर्शी व्यक्तिमत्त्वाचे चांगले कुलगुरू लाभले आहेत.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, संवाद, समन्वय आणि सहकार्य ही आपल्या कारकिर्दीची त्रिसूत्री असणार आहे. विद्यापीठात आलो असलो तरी माझी पाटी कोरी आहे. त्या कोऱ्या पाटीवर विकासाचा मंत्र लिहिण्याच्या कामी विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांनी मदत करावी. डॉ. अशोक भोईटे म्हणाले, डिस्कशन-डायलॉग-डिप्लोमसी या त्रिसूत्रीच्या आधारे विद्यापीठात कार्यरत राहिलो. विद्यापीठाचे ‘व्हिजन-२०२०’, नॅकसाठी निर्दोष असा एसएसआर अहवाल तयार करण्यात योगदान देता आले. त्यातून विद्यापीठाला ‘अ’ मानांकन मिळवून देता आले, याचा आनंद वाटतो. यावेळी मंत्री पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन नूतन कुलगुरू डॉ. शिंदे यांचे स्वागत करण्यात आले, तसेच डॉ. भोईटे व प्रा. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
माजी आमदार भगवानराव साळुंखे, बाबा सावंत, रंजना फड, डॉ. व्ही. बी. ककडे, संजय कुबल, शंकरराव कुलकर्णी, प्रताप ऊर्फ भय्या माने, डॉ. डी. आर. मोरे, प्रा. अण्णासाहेब कवणे, सुभाष कुलकर्णी, विष्णू खाडे, श्वेता परूळेकर यांची यावेळी भाषणे झाली.
प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे स्वागत यांनी केले. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
आता सत्कार नको...
विद्यापीठातील आजच्या सत्कारानंतर यापुढे कोणीही माझा सत्कार करू नये. त्यासाठी होणाऱ्या खर्चातून गरजू विद्यार्थी, विद्यार्थिनींचे प्रवेश शुल्क भरण्यासाठी मदत करा, असे आवाहन नूतन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. ते म्हणाले, डॉ. भोईटे यांनी राबविलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला गती देण्याचा प्रयत्न राहणार असून, त्यासाठी बिंदू चौकासह शहरातील अशी सार्वजनिक ठिकाणे निवडून त्या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी नूतन कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांचा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, बीसीयूडी संचालक डॉ. आर. बी. पाटील उपस्थित होते.