शित्तूर-वारुण आरोग्य वर्धिनी केंद्रात स्वॅब तपासणी करण्यात यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:21 AM2021-04-19T04:21:47+5:302021-04-19T04:21:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारुण : कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्यामुळे व शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरामध्ये बाहेरून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारुण : कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्यामुळे व शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरामध्ये बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे शित्तूर-वारुण येथील आरोग्य वर्धिनी केंद्रातच स्वॅब तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबासह मुंबई-पुण्याला असलेला शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील बहुतांशी तरुणवर्ग लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावाकडे धाव घेतो. तुरुकवाडी ते उखळू व मालेवाडी ते कांडवण दरम्यान असलेल्या १५ ते २० गावे व डोंगरदऱ्यातील वाड्या-वस्त्यांवरील तरुणांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असतो.
स्वॅब तपासणी केंद्र या परिसरात जवळपास कुठेच नसल्यामुळे बाहेरून आलेले नागरिक थेट आपआपल्या घरी जात आहेत. घरी जाणारे नागरिक होम आयसोलेट होतील याची शंभर टक्के खात्री देता येत नाही.
शाहूवाडी तालुक्यात सध्या ३ स्वॅब तपासणी केंद्रे सुरू आहेत. ही केंद्रे शित्तूर-वारुण व परिसरातील गावांपासून ३० ते ५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असल्यामुळे बाहेरून आलेले नागरिक स्वॅब तपासणीसाठी इतक्या लांब जाण्याचे कष्ट घेत नाहीत. नेमकी हीच बाब कोरोनाचा संसर्ग वाढविण्याला खतपाणी घालणारी ठरू नये यासाठी शित्तूर-वारुण आरोग्य वर्धिनी केंद्रात स्वॅब तपासणी सुरू करणे गरजेचे आहे.
फोटो:
शित्तूर-वारुण येथील प्रशस्त आरोग्य वर्धिनी केंद्र (छाया : सतीश नांगरे)