जयसिंगपुरात घेतले ‘त्या’ शिक्षकांचे स्वॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:40+5:302021-03-04T04:44:40+5:30
जयसिंगपूर : शहरातील ‘त्या’ शाळेतील शिक्षिकेच्या संपर्कातील २० शिक्षकांचे स्वॅब मंगळवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल आज बुधवारी येणार ...
जयसिंगपूर : शहरातील ‘त्या’ शाळेतील शिक्षिकेच्या संपर्कातील २० शिक्षकांचे स्वॅब मंगळवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल आज बुधवारी येणार आहे. दरम्यान, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांची यादी संकलित करुन तपासणी करण्याच्या सूचना शाळेने केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वेळीच सावध व्हावे, मास्क वापरा, नियम पाळा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
शहरातील एका शाळेतील शिक्षिकेला कोरोनाची लागण झाल्याने शहरातील अन्य शाळांमध्येही मंगळवारी भीतीचे वातावरण निर्माण झाले. आरोग्य व पालिका प्रशासनाची धावपळ उडाली. शिक्षिकेच्या संपर्कातील त्या वीस शिक्षकांनी आपले स्वॅब तपासणीसाठी दिले आहेत. तर विद्यार्थ्यांची यादी संकलित करून पालकांनी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. आज बुधवारी शिक्षकांचा तपासणी अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. या अहवालावरच कोरोनाचा संसर्ग कितपत आहे, हे समजणार आहे. दरम्यान, शहरातील काही शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, तर शहराबाहेरील अन्य गावातील शाळांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
-
-
चौकट - नागरिकांनो सावध व्हा!
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना शहरात अनेक तरुण बेफिकीरपणे वावरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शिवाय अनेक नागरिक विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचा अभाव आणि शासनाच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले. वास्तविक कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे.