'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते आक्रमक; डी वाय पाटील, फराळे कारखान्याच्या ऊस तोडी पाडल्या बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 04:52 PM2023-11-11T16:52:42+5:302023-11-11T16:53:00+5:30
श्रीकांत ऱ्हायकर धामोड: ऊस दराच्या गतसालच्या हप्त्यावरून धामोड परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आज, शनिवारी संपूर्ण ...
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड: ऊस दराच्या गतसालच्या हप्त्यावरून धामोड परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आज, शनिवारी संपूर्ण तुळशी-धामणी परिसरात मोटरसायकल रॅली काढून परिसरातील कारखान्यांच्या गट कार्यालयांना निवेदन देत काही कारखान्यांच्या सुरू असलेल्या ऊस तोडी बंद पडल्या. मोटरसायकल रॅलीमध्ये शेकडो तरुण सहभागी झाले होते. ऊसतोड सुरू असलेल्या ठिकाणी तरुणांचा आक्रमक पवित्रा बघून ऊसतोड कामगारांनी फडातून काढता पाय घेतला.
गतसालच्या उसाच्या हप्त्याची दुसरी रक्कम चारशे रुपये खात्यावर त्वरित जमा करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रा काढत कारखानदारांची चांगलीच कोंडी केली आहे. ऊस परिषदेतही दुसऱ्या हप्त्याशिवाय कोयता लावू न देण्याचा इशारा दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांच्या ऊस तोडी बंदच आहेत. पण तुळशी धामणी परिसरातील डी. वाय. पाटील साखर कारखाना व ओंकार शुगर फराळेच्या काही तोडी सुरू असल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच मोटसायकल रॅलीने घटनास्थळी जात ऊसतोडी बंद पाडल्या.
तसेच कारखान्यांच्या गट ऑफीसशी संपर्क साधून कार्यालय तात्काळ बंद करावे अशा आशयाचे निवेदन दिले. मागणी पूर्ण होईपर्यंत गट कार्यालय बंद ठेवून सहकार्य करावे अशी विनंतीही केली. यावेळी संघटनेचे विभाग प्रमुख आर डी कुरणे, महादेव पाटील, राधानगरीचे युवा अध्यक्ष कुमार कुरणे, पांडुरंग कुरणे, तुकाराम दळवी, विठ्ठल लव्हटे, अनिल तेली, संदिप फडके, शंकर पाटील, एकनाथ जांभळे, विशाल चौगले यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते