स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच घालविली रात्र, लिंगनुर-कापशीत ऊस वाहतूक धरली रोखून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:28 AM2022-11-18T11:28:56+5:302022-11-18T11:36:02+5:30
दत्ता पाटील म्हाकवे : महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा केलेला बेकायदेशीर कायदा रद्द करावा, यासह विविध मागण्यांकडे ...
दत्ता पाटील
म्हाकवे : महाविकास आघाडी सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा केलेला बेकायदेशीर कायदा रद्द करावा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलनास काल, गुरुवारी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र काही ठिकाणी ऊस वाहतूक सुरूच होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल, गुरुवारची रात्र रस्त्यावरच जागवत वाहने रोखली. त्यामुळे महाराष्ट्रातील लिंगनुर-कापशी पासून कर्नाटकातील गायकवाडी पर्यंत शंभरहून अधिक वाहनांची रांग लागली आहे.
वाहनातील ऊसासह वाहनांचे नुकसान होवू नये. यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. केवळ मुठभर कार्यकर्ते असतानही ऊस वाहतूक गेल्या १४ तासांपासून रोखून ठेवली आहे. यामागे संघटनेचे वलय असल्यानेच हे शक्य असल्याचे संघटनेचे कार्यकर्ते संभाजी यादव यांनी सांगितले. यावेळी महादेव कामते (मेतके) उत्तम भांबरे (गलगले), उत्तम आवळेकर, निपाणी तालुकाध्यक्ष भाऊसो जिनगे (आकोळ),रमेश मगदुम (सिध्दनाथ), तात्यासो पाटील, राकेश पाटील(आकोळ), शिवाजी कमळकर (यमगे), पंडीत पाटील (नंद्याळ), पांडुरंग चौगले (भडगाव), संभाजीराव यादव (लिंगनुर) यासह सीमाभागातील संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करावी, साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल ३५०० रुपये करावा, ऊसतोड मजुरांची नोंदणी व पुरवठा महामंडळाकडून करावी, या मागण्यांसाठी दोन दिवसांचे राज्यव्यापी ऊसतोड, वाहतूक बंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी स्वाभिमानीच्या आवाहनानुसार बहुतांशी ऊस उत्पादकांनी ऊसतोड घेतली नाही. अनेक ऊस वाहतूकदारांनीही वाहतूक केली नाही. काही ठिकाणी ऊस वाहतूक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र कार्यकर्त्यांनी तो हाणून पाडला.