धक्कादायक! हजारो मासे मृत झाले; स्वाभिमानीने सरकारी अधिकाऱ्याला बंधाऱ्यावरच दोरखंडाने बांधले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 06:06 PM2020-12-23T18:06:57+5:302020-12-23T18:47:45+5:30
Swabimani Shetkari Sanghatna- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्याजवळ मंगळवारी दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झालेले आढळले असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. बंधाऱ्यावरील भयानक परिस्थिती पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरच्या क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड बंधाऱ्यावर बांधून ठेवले. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी हरबड यांची सुटक केली.
कुरुंदवाड/कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्याजवळ मंगळवारी दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झालेले आढळले असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. बंधाऱ्यावरील भयानक परिस्थिती पाहून बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरच्या क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड बंधाऱ्यावर बांधून ठेवले. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी हरबड यांची सुटक केली.
सचिन हरबड हे बंधाऱ्याजवळ मृत माशांचा पंचनामा करून इथल्या परिस्थितीचा अहवाल देण्यास आले होते. यावेळी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे यांनी प्रदूषण मंडळातील प्रादेशिक अधिकारी आंधळे, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांची निलंबन करा, अशी मागणी केली.
सचिन हरबड यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंधाऱ्याचे कठड्याला दोरखंडाच्या सहाय्याने बांधून घालून संताप व्यक्त केला. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यात झालेल्या झटापटीत मध्ये काही काळ तणावाचे वातावरण बनले होते.
अखेर पर्यावरण प्रेमी उदय गायकवाड यांच्या शिष्टाईने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव अशोक शिंगारे यांनी कार्यकर्त्यांना इंचलकरंजी पालिकेने नदी पात्रातील मृत मासे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करावा, टाकवडे काळ्या ओढ्यावर तीन बंधारे ७२ तासात घालून कलोरिन डोस आणि इचलकरंजीचे मुख्याधकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर क्षेत्र अधिकारी हरबड यांची सुटका केली.
पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यात दरवर्षीप्रमाणे मृत माशांचा खच पहायला मिळाला. नदीचे प्रदूषण झालंय, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आता माशांसह नदी काठावरील माणसाचे आरोग्य धोक्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
मंगळवारी तेरवाड बंधाऱ्याजवळ दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झालेले आढळले. काही दूषित रसायनयुक्त पाण्यामुळे तडफडत असल्याचे निदर्शनास आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ तालुका युवा अध्यक्ष बंडू पाटील, सामजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांनी बंधाऱ्यावर धाव घेत पाहणी केली. त्यांनी बंधाऱ्यावरील भयानक परिस्थिती पाहून प्रदूषण मंडळ तसेच संबंधित प्रशासनावर संताप व्यक्त केला त्यांनी दोन दिवसात कारवाईची मागणी केली.
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसात याकडे सबधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देऊन प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई केली नाही तर स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करणार असा इशारा दिला होता. आंदोलनात स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, रघू नाईक, अभिजित आलासे अमीर नदाफ आदि सहभागी झाले होते.
कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोली एमआयडीसी, लक्ष्मी एमआयडीसीतील पाणी पंचगंगा नदीमध्ये जात असल्यामुळे मासे मृत पडू लागले आहेत, असा आरोप स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला. इचलकरंजी शहराचे कापसावर प्रक्रिया करणारे पाणी थेट पंचगंगा नदीमध्ये जात असल्याचे दिसत आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
- बंडू पाटील, युवा अध्यक्ष,
शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना