स्वाभिमानी एक्स्प्रेसमधील शेतक-यांचा खोळंबा, चुकीच्या मार्गानं गाडी वळवल्यानं शेतक-यांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 09:44 AM2017-11-22T09:44:22+5:302017-11-22T14:11:05+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्वाभिमानी एक्स्प्रेस ही कोल्हापूरहुन दिल्लीकडे जाताना गुजरात, राजस्थान मार्गाने दिल्लीला गेली. यावेळी गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात मोदींविरोधात घोषणाबाजी केली होती.
कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्वाभिमानी एक्स्प्रेस ही कोल्हापूरहुन दिल्लीकडे जाताना गुजरात, राजस्थान मार्गाने दिल्लीला गेली. यावेळी गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी केली होती. दरम्यान दिल्लीहून पुन्हा कोल्हापूरकडे येत असताना रेल्वे मथुरामधून कोटाकडे जाणे होते. मात्र रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सुमारे 160 किलोमीटर रेल्वे भरकटली. चुकीच्या मार्गानं गाडी वळवल्यानं शेतक-यांचा संताप झाला. याविरोधात बिनमोर रेल्वे स्थानकात शेतक-यांनी आंदोलन केलं. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी शेतकरी संख्या पाहता घातपाताचाही आरोप केला आहे.
या प्रकारामुळे बिनमोर रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे चुकीच्या दिशेला आल्याचे समोर आले. यानंतर आरगा रेल्वे कंट्रोलरची चूक झाली असल्याची माहिती स्टेशन मास्टर नाशीथ माथूर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
मध्य प्रदेशमध्ये 160 किलोमीटर स्वाभिमानी एक्स्प्रेस भरकटली
* पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी घोषणाबाजी केल्यामुळे गुजरातमधून रेल्वे न नेता अन्य मार्गांनं वळवल्याचा आरोप
* संतापलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी अडविली मालगाडी
* पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे प्रशासनविरोधात तुफान घोषणाबाजी
राजू शेट्टींकडून चौकशीची मागणी
प्रशासनाच्या चुकीमुळे 160 किलोमीटर चुकीच्या दिशेने ही रेल्वे गेल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावलेत ट्रॅफिकची समस्या असल्याने रेल्वे वेस्टर्न लाइनवरुन सेंट्रल लाइनवर घेण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तिथून रेल्वेचं तंत्रज्ञ मोनिटरिंग करून कोल्हापूर मार्गे रवाना करत असल्याचं स्पष्ट केलंय. यामुळे ही रेल्वे कोल्हापुरात पोहोचायला आता 6 ते 7 तासाचा विलंब होणार आहे.