'स्वाभिमानी'ची आक्रोश पदयात्रा उद्यापासून, शिरोळमधून प्रारंभ होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:13 PM2023-10-16T12:13:18+5:302023-10-16T12:14:54+5:30
३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किलोमीटर निघेल ही पदयात्रा
कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये मिळावा आणि राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल केल्याशिवाय ऊस गाळपास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेस उद्या, मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यापासून सकाळी आठ वाजता पदयात्रेला प्रारंभ होणार आहे.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी केवळ एफआरपीच दिली आहे. खुल्या बाजारपेठेत साखरेचे दर ३८०० रुपयांच्या घरात आहेत. पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतील आठ साखर कारखान्यांनी ४०० ते ५०० रुपये एफआरपीपेक्षा अधिक रक्कम दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची रिकव्हरी पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आहे, तरीही दुसरा हप्ता देण्यास नकार देत आहेत.
गेल्या महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. १ जुलैपासून जनजागृती अभियान सुरू केले आहे. नुकतीच दुसऱ्या हप्त्याच्या मागणीप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीत साखर कारखानदारांच्या अडेलतट्टू धोरणामुळे चर्चा फिस्कटली. त्यामुळे माजी खासदार शेट्टी यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलेला आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारपासून पदयात्रा निघणार आहे.
ही पदयात्रा गुरूदत्त, जवाहर, घोरपडे, शाहू, वारणा, क्रांती, वसंतदादा, राजारामबापू, आदी ३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किलोमीटर निघेल. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होणार आहे.
भाकरी गोळा करून
घरटी भाकरी गोळा करून पदयात्रेत शेतकऱ्यांनी जेवणाची सोय केली आहे. प्रत्येक गावात पदयात्रेचे जल्लोषी स्वागत केले जाणार आहे. जोपर्यंत ४०० रुपयांचा दुसरा हप्ता दिला जात नाही, तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होणार नाही. त्यामुळे पदयात्रेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार शेट्टी यांनी केले आहे.