स्वाभिमानी संघटनेत फूट

By admin | Published: September 21, 2014 12:39 AM2014-09-21T00:39:31+5:302014-09-21T00:45:09+5:30

खराडे, बी. जी. पाटील यांचे बंड : महायुतीला फटका शक्य

Swabhimani Sangh Sangh split | स्वाभिमानी संघटनेत फूट

स्वाभिमानी संघटनेत फूट

Next

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महायुतीशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच राज्य प्रवक्ते महेश खराडे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी आज, शनिवारी बंडखोरीचा निर्णय जाहीर केला. नेत्यांच्या भिन्न भूमिकांमुळे उमेदवारीवरून संघटनेत फूट पडली असून, त्याचा फटका महायुतीला बसणार आहे.
‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांची भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी जागांबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, तेथून ‘स्वाभिमानी’कडून महेश खराडे इच्छुक आहेत. घोरपडे यांच्या हालचालींमुळे ते अस्वस्थ असून, त्यांनी बंडखोरी जाहीर करून संपर्क, गाठीभेटी सुरू केल्याचे सांगितले. आज संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बी. जी. पाटील यांनीही इस्लामपूर मतदारसंघातून स्वत:ची उमेदवारी जाहीर करून सोमवारी (दि. २२) अर्ज भरणार असल्याचे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खराडे म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन, सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचले आहेत. पाच वर्षे आम्ही मेहनत करायची आणि अचानक उमेदवारी दुसऱ्याला द्यायची ही भूमिका संघटनेतील कार्यकर्त्यांसाठी अन्यायकारक आहे. घोरपडे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी तडजोड करून अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर पाच वर्षांत घोरपडे एकदाही फिरकले नाहीत. शेतकरी, दुष्काळग्रस्तांच्या समस्यांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. सामान्य जनता अडचणीत असताना घोरपडे अज्ञातवासात होते. मी तासगाव-कवठेमहांकाळमधून दि. २४ रोजी अर्ज भरणार आहे.
खराडे, बी. जी. पाटील यांच्या बंडखोरीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधकांची मतविभागणी होऊन महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Swabhimani Sangh Sangh split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.