उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये घेतल्याशिवाय माघार नाही; 'स्वाभिमानी'च्या आक्रोश पदयात्रेला शिरोळमधून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:13 AM2023-10-17T11:13:47+5:302023-10-17T11:15:59+5:30
३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ कि.मी पदयात्रा
संदीप बावचे
शिरोळ : उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये प्रतिटन या व राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिझीटल केल्याशिवाय यंदा गाळपास परवानगी देऊ नये, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश पद यात्रेस मंगळवारी शिरोळ येथून प्रारंभ झाला. स्वाभिमानीचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दत्त साखर कारखान्यास मागण्यांचे निवेदन देऊन पद यात्रेस सुरुवात करण्यात आली.
शिरोळ ते दत्त कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी साडेआठ वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात झाली. ढोल -हलगीच्या निनादात व घोषणाबाजी देत ही यात्रा पुढे सुरू झाली. ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत करण्यात आले, महिलांनी औक्षणही केले. शिरोळ नगरपालिकेसमोर नराराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी राजू शेट्टी यांना पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर शिवाजी तक्तापासून ही यात्रा शिरटी फाटा येथे आल्यानंतर जेसीबीतून फुलांची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. कारखानदारांकडून घामाचे दाम वसूल करूया आता माघार नाही असे फलक लक्षवेधी ठरले.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केवळ एफआरपी दिलेली आहे. साखरेचे बाजारभाव ३८०० रूपयांच्या घरात आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ४०० ते ५०० रूपये एफआरपी पेक्षा अधिक रक्कम दिली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची रिकव्हरी पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त असताना देखील दुसरा हप्ता देण्यास नकार देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.
३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किमी पदयात्रा चालत जाऊन ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होणार आहे. जोपर्यंत ४०० रूपयांचा हप्ता दिला जात नाही. तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.