‘स्वाभिमानी’ गुरुवारी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 11:46 AM2023-11-21T11:46:24+5:302023-11-21T11:51:44+5:30
आंदोलन मोडीत काढणाऱ्या मुश्रीफ, सतेज पाटीलांना मोडू, पण मागे हटणार नाही - राजू शेट्टी
कोल्हापूर : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दबावाखाली दिलेला अहवाल आम्हाला मान्य नसून आता आर या पारची लढाई सुरू करणार आहोत. पालकमंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे सर्वपक्षीय कारखानदारांचे म्होरके असून हे दोघे संघटनेचे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहेत पण जिल्ह्यातील शेतकरी त्यांना मोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून आता कोणाच्याही दडपशाहीला घाबणार नाही, गुरुवारी सकाळी अकरा वाजता पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग शिरोली पुलाचे येथे रोखणार असल्याची माहिती ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शेट्टी म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही बनाव असल्याने आपण सहभागी झालो नाही. ते आजही ‘आरएसएफ’ सूत्रानुसारच पैसे दिल्याचे सांगत आहेत. पण, सहवीजसाठी वापरलेल्या बगॅसचे पैसे ते उत्पन्नात धरत आहेत. मात्र, प्रत्यक्षात वीज विक्रीचे पैसे धरणे अपेक्षित आहे. तीच अवस्था इथेनॉलबाबतही आहे, हे सगळ्या बाबींची तपासणी केल्यानंतर आमची ४०० रुपयांची मागणी योग्यच आहे.
समितीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असून पालकमंत्री मुश्रीफ व सतेज पाटील हेच सूत्रधार असून वेगवेगळ्या आघाड्यात राहून शेतकऱ्यांना फसवण्यासाठी एकत्र आले आहेत. जर, राज्य सरकार, विरोधी पक्ष शेतकऱ्यांसोबत नसतील तर आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावीच लागेल. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नसल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. यावेळी प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्डयाण्णावार, वैभव कांबळे, अजित पोवार आदी उपस्थित होते.
कोंडी फोडणाऱ्या कारखानदारालाही थांबवले
रविवारी रात्री एक कारखानदार कोंडी फोडण्यासाठी तयार होते, मात्र त्यांनाही थांबवल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
‘स्वाभिमानी’ची ताकद दाखवतोच..
आमच्या सहनशीलतेचा अंत संपला असून आता शेंडी तूटू अथवा पारंबी आता मागे हटणार नाही. ‘स्वाभिमानी’ची ताकद काय आहे, हे दाखवतोच, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
‘स्वाभिमानी’च्या हिशोबानुसार कारखाने प्रति टन पैसे देय लागतात..
- जवाहर : २७१
- रेणूका शुगर्स (पंचगंगा) : २४५
- शरद : १०२
- गुरुदत्त : १२७
- दत्त, शिरोळ : २८१
- कुंभी : १३७
- संताजी घोरपडे : १९४
- बिद्री : ३२८
- डी. वाय. पाटील : १७०